Pune : शहरात मंगलमय वातावरणात गणेश जयंती साजरी

Pune : शहरात मंगलमय वातावरणात गणेश जयंती साजरी
Published on
Updated on

पुणे /कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : चौकाचौकात उभारण्यात आलेले मंडप, कमानी… रांगोळ्याच्या पायघड्या…फुलांची आकर्षक सजावट…विद्युत रोषणाई…गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष…सुरेल आरती आणि भक्तीगीते…महाप्रसादाचे वाटप अशा मंगलमय वातावरणात शहरात गणेश जयंती साजरी झाली. पुण्याची ग्रामदेवता कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबागेतील तळ्यातला गणपती दशभूजा मंदिर या मंदिरांसह शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार, आजच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. माघी गणेश जयंतीनिमित्त गणपती मंदिरांमध्ये तसेच घरोघरी गणपतीचे पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आबालवृध्दांनी उत्साहाने सहभाग घेतला. शहरात घरोघरी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी स्नान करून गणपतीची पूजा, दिवसभर उपास, अथर्वशीर्ष पठण, संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य अशी रेलचेल घरोघरी पहायला मिळाली. काही घरांमध्ये गणेशोत्सवाप्रमाणे दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले.

शहरातील गणेश मंडळांनीही श्री गणेश जयंतीसाठी सामाजिक उपक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी सजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी श्रीं चरणी केली.

हजारो भाविकांनी घेतले ग्रामदेवतेचे दर्शन

ग्रामदेवता श्री कसबा गणपती मंदिरसह मानाचे पाच गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, हुतात्मा बाबू गेनू, मंडई, सारसबाग, पेशवे गणेश मंदिर, जिलब्या मारुती मंदिरामध्ये सकाळापासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती. कसबा गणपती मंदिरात भरतकुमार खळदकर यांचा सनई चौघडा, सहस्त्रावर्तन, गणेश पुराण, गणेश जन्म आरती, गणेश आरती, छबिना इत्यादी कार्यक्रमांनी जन्मसोहळा पार पडला. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश याग, श्री गणेश जन्म, भक्तीसंगम- भक्तगीत व भावसंगीताचा कार्यक्रम तसेच वादक ज्योती हेगडे यांचा हिंदगंधर्व संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी नगर प्रदक्षिणा, जागर भजने इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news