Pune Flood | दौंडमध्ये शेतात पुराचं पाणी; भीमा, मुळा-मुठा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
नानगाव : दौंड तालुक्यातील भीमा व मुळा-मुठा नदी पात्रात रविवारी (दि.४) सकाळपासूनच झपाट्याने वाढ सुरु आहे. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून ठिकठिकाणी नदीकाठची शेती देखील पुराच्या पाण्याखाली जाऊ लागली आहे. जिल्ह्यातील डोंगर भागात व धरण क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पुण्यात पावसाचा 'कहर'
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता तो ३५ हजार २ क्युसेक्स इतका करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार धरणाच्या विसर्गात पुन्हा बदल करण्याची शक्यता आहे. पुरामुळे खबरदारी म्हणून भारतीय लष्कराला तैनात करण्यात आले आहे. १०५ भारतीय लष्कराचे जवान तैनात केले आहेत. भारतीय लष्कर दलाकडून बचाव कार्यासाठी होडी, ट्यूब, यासह विविध सामग्री आणली आहे.
राज्यातील बहुतांश भागाला अतिवृष्टीचा इशारा
पुणे घाटमाथा, सातारा आणि पालघरला आज (दि. ४ ) अतिवृष्टीचा रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
