

पुणे: शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (दि. २६) पुन्हा धडकला.
गेल्या महिनाभरात अशा प्रकारची धमकी देण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या वेळी न्यायालयीन कामकाज सुरळीत ठेवत बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून परिसराची तपासणी करण्यात आली.
न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यामध्ये, पुणे डिस्ट्रिक कोर्ट ३ वाजून अकरा मिनिटांनी बॉम्बच्या धमाक्याने संपेल असा मजकूर नमूद होता. याबाबतची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली.
त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने न्यायालयीन इमारती, दालने आणि वकिलांच्या चेंबरची कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, न्यायालय परिसरात नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा न्यायाधीश आणि न्यायालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षेबाबत बैठक घेण्यात आली.
याच बैठकीदरम्यान धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यापूर्वी २ आणि २३ नोव्हेंबर रोजीही अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. वारंवार धमकीचे ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.