पुणे: जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी

पुणे: जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेसाठी प्रलंबित 137 गावांतील जागांबाबत गावपातळीवर बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावा. प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनांची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जलजीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. प्रलंबित शासकीय जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, जलजीवन मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत गावाच्या दर्शनी भागात माहितीचा फलक लावावा. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रे याठिकाणी नळजोडणीची कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीत. कामांना गती देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळाचा वापर करावा. ज्या ग्रामपंचायतींनी बँकेत खाते काढले नाहीत, त्यांनी तत्काळ बँकेत खाते काढून घ्यावेत.

कामांचे उर्वरित कार्यादेश कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबर अखेरपर्यंत निर्गमित करावेत. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य कराराप्रमाणे कंत्राटदारांना मुद्रा कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेच्या कामाची छायाचित्रे अपलोड करण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news