

पुणे : पुण्याहून दिल्लीसाठी जाणार्या एअर एशिया एअरलाईन्सच्या विमानाला गुरुवारी सकाळी 9 तास उशीर झाला. त्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणारे सुमारे 180 प्रवासी पुणे विमानतळावरच अडकून पडले होते. पुणे विमानतळावरून दररोज 180 ते 190 विमानांची उड्डाणे होत असतात. त्याद्वारे दररोज 25 ते 30 हजार प्रवाशांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक होत असते. यात सर्वाधिक प्रवाशांचे पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी प्राधान्य असते.
अनेक प्रवासी कामानिमित्त, उद्योगधंद्याकरिता आणि पर्यटनासाठी ये-जा करतात. गुरुवारी अचानकच एअर एशिया कंपनीच्या विमानाला 9 तास उशीर झाला, त्यामुळे या विमानातून प्रवास करण्यासाठी पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना मानसिक त्रासदेखील झाला. सकाळी 6.35 च्या सुमारास हे विमान दिल्लीकडे उड्डाण करणार होते. मात्र, त्याला उड्डाणाकरिता 9 तास उशीर झाला. प्रवाशांना झालेल्या या त्रासाबाबत विचारणा केली असता, तांत्रिक समस्या आल्याचे सांगण्यात आले.
विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्यामुळे पुणे विमानतळावर पुणे-दिल्ली उड्डाणासाठी आलेले प्रवासी प्रचंड संतापले होते. त्यांनी या वेळी विमानाच्या उड्डाणाबाबत विमानतळ प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने कोणतेही ठोस कारण दिले नाही. प्रवाशांनी पुन: पुन्हा प्रशासनाला याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सीआयएसएफच्या जवानांनी रोखले. मात्र, त्या वेळी प्रवासी आणि त्यांच्यात वाद झाले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.