

पुणे: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राबविलेल्या प्रभावी उपायोजनांमुळे शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात लगाम लागला असला तरी, टोळीयुद्धातील रक्तचरित्र, स्वारगेट लैंगिक अत्याचार, मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण, पोर्शे प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई. नवले पुलावरील भीषण अपघात, माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर याला ड्रग्जप्रकरणी झालेली अटक, लाचखोरीत अडकलेले पोलिस अशा विविध घटनांनी 2025 वर्ष गाजले. शहरात गेल्या वर्षभरात 79 खून, तर 153 खुनाचे प्रयत्न आणि 1 हजार 453 गंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद नेहमीप्रमाणेच कायम आहे. त्याला आळा घालण्यात पोलिसांना मात्र हवे तसे यश येत नसल्याचे दिसून येते.
टोळीयुद्धातील रक्तचरित्र कायम
2024 मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनापासून सुरू झालेले टोळीयुद्धातील रक्तचरित्र 2025 या वर्षातसुद्धा कायम असल्याचे दिसून आले. वनराज यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून केला. आयुष हा बंडू आंदेकर याचा नातू होता. आयुष याचे वडील गणेश कोमकर याच्यावर वनराजच्या खुनाचा आरोप आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्री ही घटना घडली होती. या घटनेला दीड ते दोन महिन्याचा कालावधी लोटतो ना लोटतो तोपर्यंतच कोंढव्यात वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा येवलेवाडीतील खडीमशीन चौकात आंदेकर टोळीने खून केला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. वनराज यांच्या खुनासाठी वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्यात समीर काळे होता. बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार, अशी भीती गणेश याने खून होण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती, तर या दोन खुनाच्या घटनांपूर्वी आंदेकर टोळीने आंबेगाव पठार परिसरात राहणारे सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाते यांच्या घरांची रेकी केली होती. हे दोघे देखील वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपी आहेत. परंतु वेळीच भारती विद्यापीठ पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्याने तेथील प्रसंग टळला होता. टोळीयुद्धाचे सत्र सुरू झाल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी आंदेकर टोळीवर कठोर कारवाई केली, तर दुसरीकडे त्यांच्या आर्थिक स्त्रोतावर घाव घातला. मासळी बाजारापासून ते त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर महापालिकेला सोबत घेऊन कारवाई केली. टोळीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर देखील कारवाई केली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाने पुणे हादरले
पहाटे बस दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर केला होता अत्याचार. पहाटेच्या सुमारास आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला बस दाखवण्याच्या बहाण्याने स्वारगेट एस. टी. स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात फेबुवारी महिन्यात घडली. शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहर हादरले, सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात संबंधित तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. अखेर अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढत त्याला अटक केली. त्याविरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे.
गुंड नीलेश घायवळ फरार
सप्टेंबर महिन्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील पंटरांनी कोथरूड परिसरात एका तरुणावर गोळीबार केला, तर दुसऱ्यावर कोयत्याने वार केले. या गुन्ह्यांमध्ये कट आढळल्याच्या आरोपाखाली टोळीप्रमुख नीलेश गायवळ यालाही आरोपी करण्यात आले. एकूण दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) पोलिसांनी कारवाई केली. नीलेश 11 सप्टेंबरपासूनच परदेशात फरार आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो देखील अद्याप फरार आहे. खऱ्या अर्थाने गाजले ते नीलेशने अहिल्यानगर येथून काढलेल्या पासपोर्टचे प्रकरण. त्याने बनावट पत्ता देऊन हा पासपोर्ट काढल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. नीलेश अद्याप विदेशात फरार आहे. पोलिसांनी त्याला इंटरपोलमार्फत ब्लू आणि रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. घायवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खंडणी, मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग््राामीण येथे दाखल आहेत. काही गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता देखील झाली आहे. त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गतसुद्धा कारवाई झालेली आहे. दरम्यान, कोथरूडमधील या गोळीबार प्रकरणामुळे पुन्हा एकदा घायवळ चर्चेत आला. नीलेश घायवळच्या प्रकरणात त्याला आश्रय दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या गेल्या.
ऑपरेशन उमरटी
गेल्या काही वर्षांत शहरात बेकायदा पिस्तुलांचे पेव फुटल्याचे दिसून आले होते. खून, टोळीयुद्ध, वर्चस्ववादातून झालेले हल्ले, दहशतीसाठी हवेत गोळीबाराच्या घटनांमध्ये सर्रास गावठी पिस्तुलांचा वापर होत होता. ओठावर मिसरूड न फुटलेली पोरं पिस्तुलाच्या आवाजाची भाषा बोलून एकमेकांचे रक्तचरित्र रेखाटू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पिस्तूल तस्करीच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार केला. त्यासाठी निवड केली ती, नक्षवाद्यांशी दोन हात करण्याचा खमक्या अनुभव असलेले पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांची. त्यांच्याच नेतृत्वात ऑपरेशन उमरटी राबविण्यात आले. पुणे पोलिसांनी गावात घुसून यावेळी पिस्तूलनिर्मिती करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले. एवढेच नाही, तर पिस्तुले तयार करणाऱ्या गावातील तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पिस्तुलाचे सुटे भाग, बॅरल, मॅगझीन, पाईप, लेथ मशीनवरील तयार साहित्य असे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त झाले. उमरटीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
नवले पुलाजवळ मृत्यूचे तांडव
मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 13 नोव्हेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सात जण आगीत होरपळून मरण पावले होते, तर तेराजण जखमी झाले होते. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रेलरने समोरील वाहनांना धडक दिली. त्यावेळी ट्रेलर आणि कंटेनरमध्ये एक प्रवासी कार सापडली. कार आणि ट्रेलरच्या आगीत जळून काहीजणांचा मृत्यू झाला. एका लहान मुलीसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. नवले पूल परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी वेगावर मर्यादा घालण्यासह विविध उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र, तरीदेखील येथील अपघाताचे प्रमाण कमी झालेले दिसून येत नाही.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण
2025 मध्ये मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण देखील चांगलेच गाजले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित हे प्रकरण होते. त्यामध्ये पार्थ यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत. याप्रकरणी, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांच्यासह इतरांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असताना चौकशीअंती त्यांनी शीतल तेजवानी हिला अटक केली, तर पार्थ पवार यांच्यावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. तेजवानीने 2006 मध्ये तब्बल 275 जणांकडून जमीन मिळवण्यासाठी ’पॉवर ऑफ ॲटर्नी’ घेतली होती. त्यानंतर 2025 मध्ये पार्थ पवार संबंधित अमेडिया कंपनीशी करार करून ही जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
झेपावलेले खासगी विमान अर्ध्यातून परत फिरले
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत (वय 32) अचानक बेपत्ता झाल्याने फेबुवारीत पुण्यात खळबळ माजली. फोन बंद आणि ठावठिकाणा न मिळाल्याने अपहरणाचा संशय गडद झाला. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिस, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात धावपळ सुरू झाली. मात्र, चौकशीदरम्यान, तो आपल्या इतर दोन मित्रासोबत खासगी विमानाने बँकॉककडे निघाला असल्याचे समजले. त्यानेच आरटीजीएसद्वारे पैसे देऊन हे विमान बुक केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांच्या मदतीने हे खासगी विमान अखेर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. मुलाच्या या अपहरणनाट्यामुळे राज्यासह देशपातळीवरील शासकीय यंत्रणांची चांगली धावपळ झाल्याचे दिसून आले होते.
बँकॉक-पुणे हायड्रोपोनिक गांजा तस्करीचे जाळे
बँकॉकहून पुण्यात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी ही एकटी घटना नसून, गेल्या पाच ते सहा महिन्यांत अशा प्रकारच्या कोट्यवधी रुपयांच्या अमलीपदार्थ तस्करीच्या अनेक कारवाया पुणे कस्टम विभागाने उघडकीस आणल्या आहेत. विशेषतः हायड्रोपोनिक गांजा (वीड) या महागड्या अमलीपदार्थाची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय तस्करांनी पुणे विमानतळाला ’सॉफ्ट टार्गेट’ मानल्याचे चित्र समोर आले आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे गेल्या काही महिन्यांत बँकॉक, थायलंड आणि इतर आशियाई देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवण्यात आली होती. यामध्ये काही प्रवासी स्कायबॅग ट्रॉली, डबल बॉटम बॅग्स, व्हॅक्युम सील पॅकेट्स वापरून गांजाची तस्करी करत असल्याचे निदर्शनास आले होते. जप्त केलेला हायड्रोपोनिक गांजा हा उच्च प्रतीचा, कृत्रिम वातावरणात वाढवलेला असल्याने त्याची बाजारातील किंमत सामान्य गांजाच्या तुलनेत अनेकपटींनी अधिक असते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत प्रतिकिलो 80 लाख ते 1 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. या प्रकरणांमुळे पुणे हे केवळ शैक्षणिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करीचे ट्रान्झिट पॉइंट बनत चालल्याची गंभीर बाब समोर आली असून, कस्टम विभागाने तपास अधिक तीव केल्याचे सूत्रांनी सांगितले.
खडसेंचे जावई खेवलकरांची पार्टी
माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना ड्रग्जप्रकरणी पुणे पोलिसांनी जुलै महिन्यात अटक केली होती. खराडी येथील स्टेबर्ड अझुर सुटस या हॉटेलमध्ये खेवलकर आणि इतर पार्टी करत होते. पोलिसांना त्या पार्टीत ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी पोलिसांना पार्टीत गांजा आणि कोकेन हे अमलीपदार्थ मिळून आले होते. खेवलकर सोबतच दोन महिलांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण देखील राज्यात चांगलेच गाजले होते.
जुबेरचे पडघा कनेक्शनही
ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीशी संबंधित असलेल्या जुबेर इलियास हंगरगेकर याचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगशी थेट कनेक्शन असल्याचे फॉरेन्सिकच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. त्याच्या अटकेच्या महिनाभरापूर्वी शहरासह जिल्ह्यात 19 ठिकाणी छापे टाकल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे जुबेरला 27 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे रेल्वेस्थानकातून अटक केली होती. एकूण जप्त डिजिटल माहिती एक टेराबाइटपेक्षा अधिक असून, तिचे सखोल विश्लेषण सुरू आहे. जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तपास यंत्रणांच्या हाती ही महत्त्वाची माहिती लागली. जुबेरच्या टेलिग््रााम ग््रुापमधील एकूण एकशे दोन आयडींपैकी चार आयपी पत्ते निष्पन्न झाले आहेत. त्यांपैकी तीन आयपी पत्ते अफगाणिस्तानमधील, तर एक आयपी पत्ता हाँगकाँगमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जुबेरचे ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाशी असलेले कनेक्शनही उघड झाले आहे.