

सुनील माळी
“ही काय भानगड आहे ? दिल्लीतल्या सत्तेत तुम्ही तीनही पक्ष सहभागी आहात..., राज्यातल्या सत्तेत तर तु्म्ही अगदी पहिल्या क्रमांकाची पदं घेऊन मांडीला मांडी लावून बसता आहात..., मग महापालिकेच्या गल्लीत मात्र काही ठिकाणी गट्टी, तर काही ठिकाणी कट्टी ?... हा काय प्रकार आहे ?”
“अहो, कसला प्रकार आणि कसलं काय ? राज्यात आम्ही तीनही पक्ष सत्तेत आहोत आणि राज्याची निवडणूकही आम्ही तिघांनी मिळून लढवली..., पण महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे, त्यांना न्याय देण्यासाठी आहे आणि त्यामुळंच काही ठिकाणी आम्ही एक आहोत, पण काही ठिकाणी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहोत...”
“काहीतरी बाष्कळ बोलू नका..., कसली आलीये डोंबलाची कार्यकर्त्यांची निवडणूक? राज्याच्या निवडणुकीतही कार्यकर्तेच राबतात ना ? मग एकतर एकमेकांबरोबर तरी राहा किंवा विरोधात तरी उतरा...”
“नाही, नाही... असं कसं ? आमच्या पक्षाची स्वतंत्र तत्त्वं आहेत. त्या तत्त्वांवर आम्ही राज्याची निवडणूक लढलो, पण महापालिकेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, ती शहराच्या विकासाची आहे. जे कार्यकर्ते आमच्यासाठी लढले, राबले त्यांची ही निवडणूक आहे... इथं पक्ष महत्त्वाचा नसतो, तर विकास महत्त्वाचा असतो, समजलं ?”
“वा रे गब्रू वा..., पक्षाची स्वतंत्र तत्त्वं आहेत म्हणता आणि राज्याची निवडणूकही त्याच तत्त्वांवर लढवली म्हणता ? मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही तत्त्वं कुठं भेळ खायला गेली आहेत? अहो, प्रत्येक निवडणूक ही तत्त्वांवर लढली पाहिजे का नको ? ज्या पक्षांची तत्त्वे अन् कारभार लोकशाहीला, विकासाला मारक आहे, असं तुम्हाला वाटतं त्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेत तरी प्रवेश कसा द्यायचा? तिथं सत्तेचं, विकासाचं, टेंडरचं, मलिद्याचं लोणी तुम्हाला खायला मिळावं, यासाठी कुणाशीही युती-आघाडी करता ? हा तुमचा भोंदूपणा आहे, हे तुमचं तत्त्वभष्ट धोरण आहे... राज्यातल्या सत्तेतल्या तिघा पक्षांनी एकमेकांशी गट्टी-बट्टी केली ती केलीच, पण चक्क ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुकांमागून निवडणुका लढलात, त्यांच्याशीही तुम्ही गट्टी करता ?
आणि तेही राज्यातल्या सत्तेत असलेल्या तुमच्या साथीदार पक्षाविरोधात ?... बघा हं, सांगलीत अन् मालेगावातही दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची चुंबाचुंबी चक्क विरोधी काँग््रेासशी..., सोलापूरला भाजपविरोधात अजितदादा राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना एकत्र येतात..., जळगावात शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना गळाभेट घेतात..., धुळ्यात काँग््रेास, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठा यांची वेगळीच महाविकास आघाडी होते... आता पुण्याकडं आपण येऊ. अहो, राज्यात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी सत्तेत आहेत, पण पुण्यात? पुण्यात भाजपनं अजितदादांना दूर केलं का अजितदादांनी भाजपला दूर केलं तेच आम्हाला कळत नाही. आम्हाला कळतं ते एवढंच की सत्तेत गट्टी असलेल्या या दोन पक्षांत पुण्यात कट्टी का ? ... कट्टी तर कट्टी, पण चक्क ज्यांना सोडून दादा राज्यातल्या सत्तेला मिळाले, त्या शरद पवार राष्ट्रवादीशीच चक्क आघाडी ?... म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचा भाजपला अप्रत्यक्षपणं पाठिंबाच म्हणायचा की हा ?...”
“हां... आता कसं तुम्ही योग्य वळणावर आलात... अहो, तुम्ही म्हणालात ते वाक्य पुन्हा म्हणा...”
“हो, एका राष्ट्रवादीपाठोपाठ दुसरी राष्ट्रवादीचंही सत्तेतल्या भाजपशी अप्रत्यक्ष कनेक्शन जोडणंच झालं हे, असं वाटतंय...”
“थांबा, थोडं... बांधा घोडं... कळेल तुम्हाला काही दिवसांतच... रामराम, नमस्कार, मी निघतो आता पार्टी ऑफिसकडं..., राज्यातल्या सत्तेतले तीनही पक्ष एकमेकांविरोधात लढतील, अशी आताच बातमी आलीये..., पाहू, आता चढाई कशी करायची, ते नेत्यांकडनं ऐकायचं आहे मला...”