

पुणे: मित्राच्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून झालेल्या वादात एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव, जांभूळवाडी तलावावरील बांधावर घडली. रोहित नामदेव ढमाळ (रा. भूमकरवस्ती, नर्हे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी सुरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय 21, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नर्हे, सिंहगड रस्ता) याने फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
मित्राच्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून आरोपी सुरज आणि रोहित या दोघांचा वाद झाला होता. रोहित, सुरज, दीपक हे शनिवारी (14 जून) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरातील जांभुळवाडी तलावाजवळ गेले होते. तेथे सुरज, रोहित यांच्यात वाद झाला. वादातून सुरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपकने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, रोहितचा खून केल्यानंतर सुरज फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
मित्राच्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून झालेल्या वादातून सुरज सूर्यवंशी याने रोहित ढमाळ याचा खून केला आहे. आरोपी सुरजला पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून चोवीस तासांच्या आत पकडले.
- शरद झिने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आंबेगाव ठाणे