Divya Shinde Arrest : ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदेला अखेर अटक, ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

Pune Crime News : माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यावर खुनी हल्‍ला, खंडणी प्रकरणात कारवाई
Divya Shinde Arrest : ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदेला अखेर अटक, ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी
Published on: 
Updated on: 

पुणे : बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागत ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदेसह तिच्‍या साथीदारांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) यांच्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी अखेर तिला अटक करण्यात आली असून तिला 30 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पक्षाघातग्रस्त गायकवाड यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्यांना दांडके, कमरेचा पट्टा आणि लोखंडी भांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), अण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमान्वये काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करून रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३३३, १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) अन्वये काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले असून, करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ झाला. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला कोणी सांगितले नव्हते. मात्र, प्रसिद्धी केल्याचे सांगून ऑगस्टपासून तिने गायकवाड यांच्याकडे फोन व संदेशांद्वारे पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली.

१७ सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण गायकवाड यांच्या घरी गेले. ते घरी नसल्याने पत्नी व मुलाला दमदाटी करून ते निघून गेले. २३ सप्टेंबरला ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावले. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. दि. २४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तेथे आला. दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसले. त्यांनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “माझा माणूस पैसे घेण्यासाठी आला होता; तू पैसे का दिले नाहीस?”, त्यानंतर त्यांना जिवंत सोडू नका, अशा आशयाची चिथावणी देण्यात आली.

गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून मारहाण थांबविण्याची विनवणी केली. मात्र, एकाने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीबाबत धमकी देत त्यांचे तुकडे करण्याची धमकीही देण्यात आली. काही वेळाने मुलगा व सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार नेण्याची धमकी देत गायकवाड यांची कार घेऊन आरोपी निघून गेले. घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. गंभीर जखमी गायकवाड यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news