Vidhan Sabha Elections 2024: पुणे जिल्ह्यातील प्रचार तोफा थंडावल्या; उद्या मतदान

Elections 2024: वरिष्ठ नेत्यांच्या सभांसह पदयात्रा, रॅलींनी उडाला धुरळा
Vidhan Sabha Election 2024
पुणे जिल्ह्यातील प्रचार तोफा थंडावल्या; उद्या मतदानpudhari file photo
Published on
Updated on

Pune Politics: राज्यात विधानसभेसाठी बुधवारी (दि. 20) मतदान होत आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (दि. 18) सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. यादरम्यान अखेरच्या दिवशी पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आपापल्या विरोधकांवर तोफ डागली. या वरिष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेची (उबाठा) मुलूखमैदानी तोफ संजय राऊत यांचा समावेश आहे.

गेला महिनाभर सुरू असलेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर सोमवारी सायंकाळी 6 वाजता संपला. मतदानाला सामोरे जाण्याआधी अवघी एक रात्रच उरल्याने उमेदवारांसाठी ही रात्र जागते रहो अशीच असणार आहे. उमेदवारांकडून आता छुपा प्रचार वेगात सुरू झाला असून, मोबाईलवरून संपर्क साधत, एमएमएस व मेसेजद्वारे प्रचाराने वेग घेतला आहे. दुसर्‍या बाजूला रात्रीच्या हालचालींवर निवडणूक आयोगाच्या पथकांचीही करडी नजर राहणार असून, त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात करण्यात आला आहे.

Vidhan Sabha Election 2024
स्व. मदनआप्पांना अभिप्रेत असे काम करून दाखवणार : सौ. अरुणादेवी पिसाळ

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर रोजी लागू झाली. त्यानंतर उमेदवार निवडी आणि तिकीट वाटपात दहा दिवस गेले. त्यामुळे उमेदवारांचा प्रत्यक्ष प्रचार ऐन दिवाळीत म्हणजे 25 ते 27 ऑक्टोबरपासून सुरू झाला. दिवाळी संपताच 4 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात प्रचार सभांची रणधुमाळी सुरू झाली. सर्वच पक्षांतील दिग्गज नेते, स्टार प्रचारकांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जोर लावण्यासाठी शहरात सभा घेतल्या. अखेर सोमवारी जिल्ह्यात मोठ्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोर, इंदापूर आणि त्यांच्या गृह मतदारसंघात म्हणजे बारामती येथे सभा घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर आणि बारामतीमध्ये प्रचार सभा घेत सरकारच्या योजनांची माहिती देत विरोधकांवर तोफ डागली. राज्यातील दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. राहुल कुल यांच्या प्रचारासाठी दौंड तालुक्यातील वरवंड येथे सभा घेत आ. कुल यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे आश्वासन दौंडकरांना दिले. तर, शिवसेनेची (उबाठा) मुलूखमैदानी तोफ असणारे खा. संजय राऊत यांनी मुळशी तालुक्यात सभा घेतली.

Vidhan Sabha Election 2024
कार्यकर्त्यांना धमकवाल तर याद राखा : जयंत पाटील

वैयक्तिक गाठीभेठींवरही अनेकांचा भर

पुणे शहरातील प्रचाराची सांगता पदयात्रा, बाईक रॅली व गाठीभेटींच्या माध्यमातून झाली. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला प्रचाराचा धुरळा सायंकाळी सहा वाजता शांत झाला. दरम्यान, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले.

मागील पंधरा दिवसांत शहरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांच्यासह आठ केंद्रीय मंत्री, दोन केंद्रीय राज्यमंत्री, दोन राज्येचे मुख्यमंत्री, दोन राज्याचे उपमुख्यमंत्री, एका राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय व राज्यांतील जवळपास दहा पदाधिकार्‍यांनी सभा, रॅली, पदयात्रा व पत्रकार परिषदांच्या माध्यमातून हजेरी लावली.

याशिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, इमरान प्रतापगडी, सचिन पायलट, खा. संजय राऊत यांच्यासह विविध नेत्यांनी सभा, पदयात्रा, प्रचार रॅलींसाठी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसाठी शहरात चार सभा घेतल्या.

पिंपरी-चिंचवड, मावळातील प्रचार थंडावला

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन व मावळातील एक मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करून 14 दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. अहोरात्र प्रचारात झोकून देऊन काम केले गेले. प्रसंगी मित्रत्वात दुश्मनी आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणसंग्रामाने तापलेले वातावरण सोमवारी सायंकाळी थंडावले. तूर्तास मतदारसंघात काहीसे शांत वातावरण निर्माण झाले आहे.

गेले दोन आठवडे शहरातील वातावरण निवडणूकमय झाले होते. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, बैठका, मेळावे, जाहीर सभा या माध्यमातून जोरदार प्रचार करण्यात आला. रिक्षा, एलईडी व्हॅन, पथनाट्याच्या गाड्याद्वारे उमेदवारांकडून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

मतांचा जोगवा मागत घरोघरी पत्रके वाटली गेली. दररोज सकाळी सातला सुरू होणार प्रचार रात्री दहाला संपत होता. त्यानंतर विविध बैठकांचे सत्र मध्यरात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालत. पुन्हा सकाळपासून प्रचार असे 14 दिवस प्रचारात उमेदवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्ते तसेच, पडद्यामागील टीम प्रचंड व्यस्त होती.

देश व राज्यपातळीवरील नेत्यांच्या जाहीर सभांमुळे शहराचे वातावरण ढवळून निघाले. आरोप व प्रत्यारोपांमुळे निवडणुकीचा ज्वर वाढत गेला. गल्लोगल्लीत घोषणा व रिक्षावरील स्पीकरचा आवाज सातत्याने घुमत होता.

सोमवार (दि.. 18) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारसंघात दुचारी रॅली व पदयात्रा काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आवर्जून महापुरुषांचे पुतळे तसेच, मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यात आले. रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह अक्षरश: शिगेला पोहचला होता. दुपारी विश्रांती न घेता अखंडपणे सायंकाळपर्यंत प्रचार कायम होता.

आता यापुढे छुपा प्रचार

विधानसभा निवडणुकीसाठी आता शेवटचे दोन दिवस उरले असून, उमेदवारांची कसोटी लागणार आहे. अनेक कार्यकर्ते छोट्या-मोठ्या गोष्टींवरून नाराज होऊन या पक्षातून त्या पक्षात उड्या मारलेल्यांची

नाराजी दूर करून त्यांना आपल्या पक्षात परत असण्यासाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून आपलेसे करणे तसेच गावोगावच्या मतदारांना लक्ष्मीदर्शन करून एक-एक मत आपल्या पदरात पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून आता छुपा प्रचार करून घेण्यावर जोर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news