‘ससून’चे अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती

‘ससून’चे अधिकारी,  कर्मचाऱ्यांची झाडाझडती
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : बिल्डरपुत्राच्या रक्ताचा नमुना घेताना कोणकोणते कर्मचारी हजर होते? सीएमओ कार्यालयात कोणाची ड्युटी होती? डॉ. अजय तावरेंनी डॉ. श्रीहरी हाळनोरसह आणखी कोणाला फोन केला? रुग्णालयात एवढी गंभीर बाब घडत असल्याची अधिष्ठाता आणि अधीक्षकांना कल्पना होती का? अशा प्रश्नांची सरबत्ती ससूनमध्ये मंगळवारी सुरू होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने तब्बल 8 तास अधिष्ठाता कार्यालयात आठ ते दहाजणांची झाडाझडती घेतली.

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्राला रविवारी (दि. 19) ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला. अपघातग्रस्त विभागातील वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी नमुना घेतला. त्याचवेळी न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी फोनवरून आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची पिशवी कचर्‍यात फेकून देण्यास सांगितले आणि त्याऐवजी दुसर्‍या रक्ताचा नमुना आरोपीच्या नावाने पुढे पाठवण्यास सांगितले. पोलिस तपासात हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यावर 26 मे रोजी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना अटक करण्यात आली.

चौकशी समितीने घेतले जबाब

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये केलेल्या फेरफारप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सोमवारी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी हे समितीतील सदस्य मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ससून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सुरू झालेला चौकशीचा ससेमिरा तब्बल आठ तास सुरू होता. यामध्ये कॅज्युअलिटी विभागातील ड्युटीवर असलेली नर्स, वॉर्ड बॉय, सहायक डॉक्टर, विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासह आठजणांची कसून चौकशी केली. यामध्ये लेखी जबाबही नोंदवून घेण्यात आले.

चौकशीचा घटनाक्रम

* चौकशी समिती सकाळी 11.30 वा.च्या दरम्यान ससून रुग्णालयात दाखल
* घटनास्थळी (सीएमओ) प्रत्यक्ष जाऊन पाहणी
* आपत्कालीन कक्ष, न्याय वैद्यक विभाग, प्रयोगशाळा आदींची पाहणी
* रजिस्टरमधील नोंदींची तपासणी
* ज्या बेडवर आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले त्या जागेची, कक्षाची आणि सीसीटीव्हीची पाहणी
* सदस्य अधिष्ठाता कार्यालयात दाखल
* लेखी जबाब, साक्षी-पुरावे नोंदवून घेतले
* जबाबांची एकत्रित आणि वैयक्तिक उलटतपासणी
* अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याशी चर्चा

'ससून' प्रकरणातील चौकशी समिती वादात

पुणे : वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेली समिती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे. चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या अधिकार्‍यांचीच चौकशी समितीत नियुक्ती कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी रक्त नमुना फेरफार प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समितीच्या अध्यक्षपदी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सापळे यांची जे. जे. रुग्णालयातील सामान खरेदी-विक्री प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशीच्या फेर्‍यात असलेल्या व्यक्तीचाच विशेष चौकशी समितीत समावेश करणे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका दानवे यांनी घेतली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर सुषमा अंधारे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, चौकशी समितीमध्ये अध्यक्ष असलेल्या डॉ. सापळे यांच्यावर रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप यामिनी जाधव यांनी केला आहे. सापळे यांची नियुक्ती रद्द व्हायला हवी. वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकारी किती प्रामाणिकपणे चौकशी करणार? हा प्रश्नच आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयाला मंगळवारी छावणीचे स्वरूप आले होते. अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. आतमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची पोलिस आणि सुरक्षा रक्षक कसून चौकशी करीत होते. अधिष्ठाता कार्यालयाबाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती. अधिष्ठाता कार्यालयाबाहेरही पोलिस आणि सुरक्षा रक्षक उभे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news