

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करण्यासाठी वसूल केला जाणारा वाहन प्रवेश शुल्क कर रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रवेश शुल्क बंद करण्याचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये प्रवेश शुल्क बंद करण्यात आल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
केंद्रीय संरक्षण विभागाने देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना 'वाहन प्रवेश शुल्क' आकारणी बंद करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खडकी आणि देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्काळ त्याची अंमलबजावणी केली. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड 'वाहन प्रवेश करा'ची (व्हेइकल एन्ट्री टॅक्स) आकारणी करते. सदर पत्र पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू नाही, असे तत्कालीन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले होते. त्या वेळी विविध संघटनांनी वाहन शुल्क बंद करा, अशी मागणी केली होती. पुणे कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी वसुली केंद्र आहेत. त्यातून बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.
काय म्हटले आहे पत्रात
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून बॅरिकेड, नाके, संकलन केंद्रे उभारून वाहन प्रवेश शुल्क घेतले जाते. ही बाब केंद्र सरकारच्या मालाची ने-आण व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या पुढाकाराशी आणि 'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ डुइंग बिझनेस'साठीच्या प्रयत्नांशी अनुसरून नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांनी यापुढे वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करावी, असे त्या वेळी पत्रात नमूद केले होते.
अधिकारी म्हणतात, अधिकृत पत्र आले नाही
संरक्षण मंत्रालयाने गॅझेट प्रसिद्ध करून वाहन प्रवेश शुल्क घेऊ नका, असे आदेश दिले आहेत. हा गॅझेट आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. परंतु जोपर्यंत आम्हाला अधिकृत बंद करा, असे पत्र येत नाही, तोपर्यंत वसुली सुरू राहील, असे कॅन्टोन्मेंट अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.