Pune Book Festival : वाचन न करणारे कालबाह्य : डॉ. रघुनाथ माशेलकर

Pune Book Festival : वाचन न करणारे कालबाह्य : डॉ. रघुनाथ माशेलकर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'आधुनिक काळात दोन ते पाच वर्षांमध्ये ज्ञान बदलत असून, त्यात भरपूर वाढ होत आहे. त्यामुळे आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायला हवे. त्यातूनच नवसर्जनशीलता निर्माण होणार आहे. अशा पद्धतीने ज्ञानार्जन न करणारे व्यक्ती 'आउट ऑफ डेट' होतील,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन 24 डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत सागर देशपांडे यांनी घेतली. या वेळी महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी डॉ. माशेलकर यांचा सत्कार केला.

डॉ. माशेलकर म्हणाले, 'वाचायला लागल्यावर तुमचा शब्दसंग्रह उत्तम होतो. याचा फायदा तुम्हाला लिहायला आणि वक्तृत्वाच्या दृष्टीने उत्तम होतो. विविध दृष्टिकोन समजतात. त्यामुळे आपण वाचन करायला हवे. एखादी गोष्ट तुम्हाला प्रभावीपणे कमी वाक्यात मांडायची असल्यास, तुमच्याकडे प्रभावी शब्दसंग्रह हवा. त्यासाठी पुस्तके वाचनासाठी वेळ काढायला हवा. मला रहस्यकथा आवडतात. त्याचप्रमाणे आत्मचरित्रावरील पुस्तके वाचायला आवडतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर अशा व्यक्तिमत्त्वांची पुस्तके खूप भावली,' असेही डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

डॉ. माशेलकर म्हणाले की, 'मी महापालिकेच्या शाळेत मराठी माध्यमात शिकलो. शाळा महापालिकेची होती, तरी माझ्या जडणघडणीवर परिणाम झाला नाही. शाळेत असल्यापासूनच, मला वाचनाची भरपूर आवड होती. एखादे पुस्तक हाती पडले, की ते पूर्ण वाचूनच सोडायचो. नव्या पुस्तकांचा सुगंध मला फार आवडतो. लहानपणी माझ्या प्रवासात साधारण दररोज 20 मिनिटांचा वेळ जायचा. या वेळी पुस्तक वाचायचो. लहानपणी संजय, बालमित्र, मंथन अशी अनेक मासिके वाचायचो आणि त्यात लिहायचो. त्या वेळी माझ्या अनेक लेखांना पारितोषिकेही मिळायची.' 'पुणे शहर हे अनेक महोत्सवांचे शहर आहे. या महोत्सवात आता पुणे पुस्तक महोत्सवाची भर पडली आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळत आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ही चांगली बाब आहे,' असेदेखील माशेलकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news