पुणे पुस्तक महोत्सव : 8.50 लाख पुस्तकांची विक्री ; 11 कोटींची उलाढाल

पुणे पुस्तक महोत्सव : 8.50 लाख पुस्तकांची विक्री ; 11 कोटींची उलाढाल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, या पुस्तक महोत्सवातून 8.50 लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तब्बल 4.5 लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट देत वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. या महोत्सवात पुस्तक विक्रीतून साधारण 11 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे पुढील वर्षीही हा महोत्सव अशाच पद्धतीने धुमधडाक्यात आयोजित केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाची नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात रविवारी सांगता झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. समारोपप्रसंगी आकाशात फुगे सोडण्यात आले. या महोत्सवाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी खडकी शिक्षण संस्था, कृष्णकुमार गोयल, सूर्यकांत काकडे ग्रुप, पंचशील ग्रुप, डी. वाय. पाटील समूह, लोकमान्य ग्रुप, पुनीत बालन ग्रुप, कोहिनूर ग्रुप, सुहाना ग्रुप, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आदींचे विशेष सहकार्य लाभले.

या महोत्सवाला भेट देणार्‍या आणि पुस्तकांची खरेदी करणार्‍यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक होती. या पुस्तक महोत्सवात नरेंद्र मोदीलिखित 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या 87 हजार प्रती, तर शिवराज्याभिषेक पुस्तकाच्या 69 हजार प्रती वितरित करण्यात आल्या, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. या महोत्सवाच्या संयोजन सामितीत प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अ‍ॅड. मंदार जोशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राहुल पाखरे , शैलेश जोशी, संजय मयेकर, मिलिंद कुलकर्णी आदींनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव होणार आहे. या महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाचे एक दालन राहणार आहे. या दालनातून पुणे पुस्तक महोत्सवाविषयी माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रसार – प्रचारासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे राजेश पांडे आणि एनबीटी अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात विविध प्रकारची पुस्तके होती. ही पुस्तके नेहमीपेक्षा वेगळी होती, हे या पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट्ये ठरले. एकाचवेळी वेदांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तके पाहिली. वैदिक गणित ते आधुनिक शास्त्राची अनेक पुस्तके पाहायला मिळाली. इथे होणारी गर्दी अविस्मरणीय असून, या महोत्सवातून काही लाख शब्द हे नागरिकांना कळणार आहे. राजेश पांडे यांना विश्वविक्रमाची नवलाई नाही. त्यांनी 1992 मध्ये विद्यार्थ्यांचा जगातील सर्वात मोठा मोर्चा काढला होता
                                                                  – प्रवीण तरडे, अभिनेता

पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. हा संपूर्ण महोत्सव अविस्मरणीय झाला. या महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी करतांना पाहिले. त्यामुळे मुले वाचत नाही, हे मला अजिबात पटलेच नाही. पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करणार्‍या सर्व पुणेकरांचे अभिनंदन करतो. या महोत्सवाच्या आयोजनासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.
                                                       – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

महोत्सवात चार विश्वविक्रम
बालक – पालक वाचन उपक्रम ( सुमारे 3 हजार पालकांनी एकच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या,)
भारत शब्द 7500 हजार पुस्तकांमधून लिहिण्यात आला.
'जयतु भारत' हे वाक्य 15 हजार पुस्तकांमधून लिहिण्यात आले. एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 11 हजार 200 जणांकडून सलग 30 मिनिटे वाचण्यात आला.

पुणेकरांनी पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत काही सूचना असतील, तर त्या आवर्जून द्या. पुढील वर्षी यापेक्षाही भव्य पुणे पुस्तक महोत्सव करून, पुणे पुस्तक महोत्सवाला पुण्याची ओळख करुयात.
                                              – राजेश पांडे, संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news