

पुणे: पुण्याच्या शहर प्रश्नांवर आवाज उठवा, नागरिकांच्या समस्या सभागृहात प्रभावीपणे मांडा आणि विरोधकांच्या आरोपांना आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी भाजप नगरसेवकांना दिल्या.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी रस्ते, वाहतूक, भूसंपादन आणि अपघातांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत आपली सक्रियता दाखवून दिली.
त्यामुळे मोहोळांच्या बैठकीच्या 'कानपिचक्यांचा' परिणाम मुख्य सभेत दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विरोधकांना चिमटे काढत दिलेले प्रत्युत्तर देखील चर्चेचा विषय ठरला.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे सभागृहात चांगलेच पडसाद उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाजपने विरोधकांना उत्तर देत शहराच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. भाजपच्या नगरसेवकांनी विविध प्रश्न सभागृहात उपस्थित केले. नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला महापालिकेने आर्थिक मदत द्यावी, जखमी बहिणीच्या उपचारासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली.
कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर, आयुक्तांसह मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पथ आणि मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोमल नवले यांनी धायरी-कात्रज बायपासवरील खड्डे आणि आरएमसी मिक्सर वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
साहिल केदारी यांनी सोलापूर महामार्गाला समांतर कालवा रस्ता दुचाकी व हलक्या वाहनांसाठी खुला करण्याबरोबरच सोपानबागमधील रखडलेल्या डीपी रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी केली. अतुल तरवडे, संगीता दांगट, महेश वाबळे, संदीप बेलदरे पाटील, नारायण गलांडे, वर्षा तापकीर यांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला धारेवर धरले.
बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडी सोडवा; रखडलेल्या रस्त्यांना गती द्या
बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे परिसरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत, अशी मागणी नगरसेविका मयूरी कोकाटे यांनी केली. सूस आणि म्हाळुंगे परिसरातील आरपी रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. तसेच बाणेर-बालेवाडीमधील डीपी रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावी, पाषाण-सुतारवाडी परिसरातील प्रलंबित डीपी रस्त्यांची कामेही प्रशासनाने प्राधान्याने हाती घ्यावीत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
‘डीपी’ रस्त्यांसाठी निधी द्या
धानोरी-लोहगावसह समाविष्ट गावांमधील अनेक डीपी व आरपी रस्ते भूसंपादनाअभावी रखडले आहेत. अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी भरीव तरतूद करून प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. फायनान्स चौक-धानोरी रस्त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची एनओसी घेऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणी अनिल टिंगरे यांनी केली.
‘निंदकाचे घर असावे शेजारी’
गणेश बिडकर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना 'आरसा' आणि 'निंदकाचे घर असावे शेजारी' या म्हणींचा आधार घेत चिमटे काढले. विरोधकांनी दाखविलेल्या कमतरतांमधून प्रशासनाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मान्य करतानाच, २०१७ पासून भाजपच्या काळात झालेल्या विकासकामांची यादीही त्यांनी सभागृहात वाचली.
'तुम्ही आमच्यावर अशाच प्रकारे टीका करत राहा, त्याचा आम्हाला फायदा होतो,' असे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर मिश्कील टोला लगावला. मात्र, रस्त्यावरील अपघातांचे समर्थन होऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.