

पुणे : बाणेर येथील मालमत्ता क्र. 216, हि. नं. 6 या ठिकाणी मान्य नकाशाव्यतिरिक्त झालेलले सहाव्या आणि सातव्या मजल्याचे बांधकाम महापालिकेच्या निदर्शनास आणून न दिल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी कारवाई करीत त्यांना निलंबित केले आहे. तसेच, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. टीडीआर विभागातील कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ अशी निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.(Latest Pune News)
बाणेर येथील मालमत्ता क्र. 216, हि. नं. 6 या ठिकाणी एका इमातीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीला केवळ 5 मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र, मान्य नकाशाव्यतिरिक्त इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. सहावा आणि सातवा मजला बांधकामासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. परंतु, त्याला मंजुरी देण्यात आली नव्हती. या बांधकामस्थळाची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी सहाव्या मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण झालेले आढळले, तर सातव्या मजल्याचे बांधकाम सुरू असल्याचे आढळले.
ही बाब कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे त्यांनी कामात कुचराई केल्याचे निष्पन्न झाले. ही बाब आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आयुक्त नवल किशोर राम यांनी ही बाब गंभीर्याने घेत सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त विजयकुमार थोरात यांना दोघांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 20) शुभांगी तरुकमारे आणि संदीप मिसाळ यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 56 (2) (फ) नुसार खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन काळ व चौकशीदरम्यान त्यांना मनपा सेवानियमांनुसार निर्वाहभत्ता मिळणार असून, महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना शहराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना चौकशीची संपूर्ण कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहे. नोटीस बजाविणे, अधिकारी नियुक्त करणे आणि साक्षीदार तपासणी ही कार्यवाही लवकर पूर्ण करावी, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.