

पुणे : बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक विचारल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. अजित पवार यांच्या या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यामुळे पवार यांनी अधिक प्रश्न विचारणे टाळत इतर गोष्टींबाबत विचारणा केली. अजित पवार यांनी मेट्रो अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बुधवारी (दि. 15) सकाळी सात वाजता मुठा नदीवर मेट्रो प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या ’तानपुरा बिज’ची पाहणी केली.
या वेळी अधिकाऱ्यांकडून त्यांना बाबा भिडे पुलावर मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाची माहिती दिली जात होती. अधिकारी नियोजित पुलाचे तैलचित्र व ड्रॉइंग दाखवत असताना अचानकच पवार यांनी, ’बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला. पवार यांनी अचानक हा प्रश्न विचारल्यामुळे अधिकारी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. (Pune Latest News)
अधिकाऱ्यांची चलबिचल पाहून पवार यांनी या विषयावर अधिक प्रश्न टाळून पादचारी पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे? अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी हे काम तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘या पुलाचे काम झाल्यानंतर भिडे पूल आपण काढून टाकू.’
त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, भिडे पूल हा डेक्कन व शनिवार पेठ परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर किंवा पादचारी पुलाच्या कामामुळे हा पूल बंद ठेवावा लागतो. पूल बंद झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) आणि डेक्कन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांनी तानपुरा बिजची पाहणी करताना, कामातील अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या.