Pune : आणखी एका बीआरटीचा बळी!

Pune : आणखी एका बीआरटीचा बळी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनाअभावी आठ वर्षे रखडलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचे महापालिकेने हाती घेतलेले काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर प्रस्तावित बीआरटी होईल आणि निगडी ते शिवाजीनगर यादरम्यानचा पीएमपीएमएलचा प्रवास सुखकर होईल, असे मानले जात होते. मात्र, या रस्त्यावर बीआरटीऐवजी पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरातील आणखी एका बीआरटी मार्गाचा बळी जाणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, पुणे महापालिका हद्दीत खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये भूसंपादनाअभावी 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नव्हते. हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस बि—ज) 42 मीटर रुंदीचा अपेक्षित आहे. मात्र, तो केवळ 21 मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने 2016 मध्ये याची निविदा काढली होती.

मात्र, रस्त्यासाठी जागाच ताब्यात नसल्याने काम होऊ शकले नव्हते. सहा वर्षांनंतर लष्कराने ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. काम गतीने व युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या रस्त्यावर निगडी ते शिवाजीनगर (सीओईपी) बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. निगडीपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, यादरम्यान सेवेचा वापरही सुरू आहे.

पण, पुणे महापालिकेच्या हद्दीत जागा ताब्यात नसल्याने बीआरटी सेवा खंडित झाली आहे. अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रिज) यादरम्यानचे रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील प्रस्तावित बीआरटी पूर्ण होईल आणि पीएमपीएमएलचा प्रवास निगडी ते शिवाजीनगर विनाअडथळा पूर्ण होईल, असे मानले जात होते. मात्र, महापालिकेने बीआरटी मार्ग न करता पीएमपीएमएलसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बससाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठोस कार्यक्रम नाही

सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार महापालिकेने अहमदाबादच्या धर्तीवर शहरातील विविध 23 रस्त्यांवर बीआरटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय 2006 मध्ये घेतला. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेतून सुमारे एक हजार कोटीचा निधी मिळाला. मात्र, कोणत्याच सत्ताधार्‍यांनी बीआरटीचे जाळे वाढविण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविला नाही. केवळ केंद्राचे अनुदान प्राप्त करण्यासाठी हा प्रकल्प जिवंत ठेवण्याचे काम करण्यात आले. शहरात 117 किमी लांबीचे बीआरटी प्रकल्प करण्याचे नियोजन असताना केवळ 26 किमी लांबीचाच बीआरटी मार्ग करण्यात आला.

त्यामध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते खराडी (आपले घर) स्वारगेट ते हडपसर आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गांचा समावेश आहे. हडपसर ते स्वारगेट यादरम्यानची बीआरटी गुंडाळली आहे. संगमवाडी ते येरवडा यादरम्यानचा बीआरटी मार्ग तयार करून काही महिन्यांतच मोडीत काढला. नगर स्त्यावरील बीआरटी काढण्यात आली आहे. यानंतर आता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रिज) यादरम्यानच्या बीआरटीचा जन्म होण्यापूर्वीच बळी घेण्याचे नियोजन सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news