

पुणेः माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षयला त्याच्या एका मित्राने चार-पाच महिन्यांपूर्वी अलर्ट केले होते. ’आंदेकर टोळी तुझे बरेवाईट करणार आहे,’ असे सांगितले होते.
बुधवारी (दि. 20) सकाळी दहाच्या सुमारास सातारा रोड बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या पंटरांनी संधी मिळताच अक्षय याच्यावर गोळीबार करून धारधार शस्त्राने वार केले. मात्र, सुदैवाने तो वाचला.
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात आवेज शेख याने अक्षय याच्यावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. त्यानेच हल्ल्यासाठी पोरे एकत्र केली. आवेज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो कृष्णा आंदेकरचा नंबरकारी आहे. त्याच्यावर कोंढव्यातील गोळीबारप्रकरणी मोक्काअंतर्गत कारवाईदेखील झाली होती.
तत्कालीन पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. सध्या तो जामिनावर होता. आंदेकर टोळीने वनराजच्या खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून केला. त्यानंतर आवेज पुण्यातून फरार झाला होता. त्याच्याबरोबर इतर काही साथीदार देखील होते.
त्यांनी पाच ते सहा महिने उत्तर प्रदेशात मुक्काम ठोकला होता. अलीकडे दोन तीन महिन्यांपूर्वी तो पुण्यात आला होता. कृष्णा आंदेकर याने कारागृहात जाण्यापूर्वी पिस्तुले आणि इतर हत्यारे आवेज याच्याकडे दिली होती. तो उत्तर प्रदेशात गेल्यानंतर त्याने पिस्तुले आपल्याच घरात ठेवल्याची माहिती आहे.
पुण्यात परत आल्यानंतर आवेजने आपले टार्गेट निश्चित केले. अक्षय मस्के हा त्याच्या रडारवर होता. त्याने आपल्या इतर साथीदारांची जुळवाजुळव केली आणि बालाजीनगर परिसरातील रिक्षाथांब्यावर अक्षय याच्यावर आवेज शेख आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. दोन पिस्तुलातून अक्षय याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते.
त्यातील एक पिस्तूल आवेज याच्या हातात होते, तर इतरांनी शस्त्राने वार केले. एकंदर ही घटना पाहिली तर आवेज शेख हा अक्षय मस्के याच्यावरील खुनी हल्ल्याचा प्रमुख असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासातून निदर्शनास येते. आंदेकर टोळीने आरोपींच्या नातेवाईकांना लक्ष असून, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते या दोघांच्या नोतवाईकांना लक्ष करण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांना चाहूल लागल्याने त्यांचा तो प्रयत्न फसला.
या टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर, समीर काळेचा भाऊ गणेश काळे यांना संपवल्यानंतर अक्षय म्हस्के याच्या खुनाचे टार्गेट निश्चित झाले होते; परंतु तो सुदैवाने वाचला. मात्र, या खूनसत्रामुळे आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.