

Pune News: प्रवासी वाहतुकीमध्ये पुणे विमानतळ ऑक्टोबर 2024 या महिन्यात देशात नवव्या क्रमांकावर आले आहे. या महिन्यात पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी मिळून आठ लाख 59 हजार 229 प्रवाशांनी प्रवास केला. ही प्रवासीसंख्या देशातील इतर विमानतळांच्या तुलनेत नवव्या क्रमांकाची होती.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळ आता चढत्या क्रमांकावर जात आहे. समाधानकारक प्रवासी सुविधा पुरवण्यात पुणे विमानतळ जगात 76 क्रमांकावरून 74 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. नुकतेच विमानतळ प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आता प्रवासी वाहतुकीतही पुणे विमानतळ आता नवव्या क्रमांकावर आले आहे. आगामी काळात धावपट्टीचा विस्तार झाल्यावर यामध्ये आणखी चांगली सुधारणा होईल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
...असा मिळाला पुण्याला नववा क्रमांक
कामधंदा, पर्यटनासह विविध कामांनिमित्त पुणेकरांचा विमानप्रवास अलीकडील काळात वाढला आहे. यासोबतच मालवाहतुकीतही पुणे विमानतळ आता आघाडीवर जात आहे. या सर्वांमध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत 2024 मध्ये पुणे विमानतळावर वाढ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. समाधानकारक प्रवासी सेवा पुरवण्यात पुणे विमानतळाने जगात नुकताच 74 वा क्रमांक पटकावला आहे, तर आता प्रवासीसंख्येत नववा क्रमांक पटकावला आहे.
प्रवासी वाहतूक संख्येत पहिल्या क्रमांकावर दिल्ली विमानतळ आहे, तर दुसर्या क्रमांकावर मुंबई, तिसर्या क्रमांकावर बेंगळुरू, चौथ्या क्रमांकावर हैदराबाद, पाचव्या क्रमांकावर कोलकत्ता, सहाव्या क्रमांकावर चेन्नई, सातव्या क्रमांकावर अहमदाबाद, आठव्या क्रमांकावर कोची, तर नवव्या क्रमांकावर पुणे शहराचा क्रमांक लागतो आहे. तसेच, दहावा क्रमांक गोव्यातील डाबोलिम विमानतळाचा लागत आहे.