

प्रसाद जगताप
पुणे: पुणे विमानतळाने फक्त प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर मालवाहतुकीतही प्रभावी कामगिरी केली आहे. सन 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये कार्गो वाहतुकीमध्ये सकारात्मक वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत (कार्गो) 1.8 टक्के, तर देशांतर्गत मालवाहतुकीत 23.9 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. यावरून पुणे आता पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून समोर येत असल्याचे दिसत आहे.
अशी झाली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक
विमानतळ प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, सन 2025 या वर्षात पुणे विमानतळावरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीने नवा टप्पा गाठला आहे. या वर्षभरात एकूण 123.50 टन आंतरराष्ट्रीय मालाची वाहतूक झाली होती. तर सन 2024 मध्ये हा आकडा 121.30 टन इतका होता. यावरून 1.8 टक्के आंतरराष्ट्रीय माल वाहतूक झाल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाने केली आहे.
देशांतर्गत मालवाहतुकीतही आघाडी
पुणे विमानतळाने देशांतर्गत कार्गो वाहतुकीतही मोठी मजल मारली आहे. 2025 मध्ये एकूण 49,595.20 टन देशांतर्गत मालाची वाहतूक झाली, जी 2024 मधील 40,028.30 टनांच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचे दाखवत आहे. यावरून देशांतर्गत कार्गोमध्ये सुमारे 23.9 टक्के वाढ झाल्याची नोंद विमानतळ प्रशासनाने केली आहे.
परदेशात सर्वाधिक ऑटोमोबाईल मालाची वाहतूक
पुण्यातून परदेशात जाणाऱ्या मालामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यात ऑटो पार्टसची अधिक वाहतूक होते. एकूण आंतरराष्ट्रीय कार्गोमध्ये सर्वाधिक 70 टक्के वाटा हा ऑटो पार्टसचा आहे. तर नाशवंत वस्तू म्हणजेच फळे, भाजीपाला आणि अन्नपदार्थांचा वाटा 15 टक्के आहे. याशिवाय इतर माल म्हणजेच किरकोळ आणि संकीर्ण वस्तू यांचा 15 टक्के वाटा आहे.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. विशेषतः आयटी प्रोफेशनल, ऑटोमोबाईल हब आणि शेती उत्पादनांच्या वाढत्या निर्यातीमुळे पुण्यातून परदेशात माल पाठवण्याचे प्रमाण वाढत आहे. पुण्याचा विकसनाचा वाढता विस्तार पाहता, भविष्यात कार्गो क्षमतेत आणखी वाढ होऊ शकते.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ