Pune Pollutuion: पुण्यावर प्रदूषणाची दाट छाया; कार्बन हवेत सोडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले

पालिकेच्या पर्यावरण अहवालातील माहिती
Pune News
पुण्यावर प्रदूषणाची दाट छाया; कार्बन हवेत सोडण्याचे प्रमाण दुपटीने वाढलेPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहरातील कार्बन उत्सर्जनात गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. ही वाढ शहराच्या पर्यावरणासाठी गंभीर इशारा ठरत आहे. पुणे महापालिकेच्या 2024-25 पर्यावरण सद्य:स्थिती अहवालालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

शहरात एका वर्षात तब्बल 1 कोटी 2 लाख 70 हजार 77 टन कार्बन उत्सर्जन केले जात आहे. प्रत्येक पुणेकर नागरिकाकडून सरासरी 2.47 टन कार्बन उत्सर्जन केले जात आहे. यासह गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खराब दिवसांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. तर, पुण्याच्या रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांची संख्या वर्षभरात तब्बल तीन लाखांनी वाढली आहे. यामुळे प्रदूषणातदेखील वाढ झाली आहे. (Latest Pune News)

Pune News
Pune Crime: भिकेसाठी मुलीचे अपहरण; धाराशिवमधून सुखरूप सुटका, पाच जणांना बेड्या

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्यावरण सद्य:स्थिती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्यासह महापालिकेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालात शहरातील हवामान, पाणी गुणवत्ता, ऊर्जा वापर, जैवविविधता आणि आरोग्य अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे.

या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2023-24 च्या तुलनेत 2024-25 वर्षामध्ये हवेचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे चांगल्या दिवसांची संख्या कमी झाली अहे. खराब दिवसांचे प्रमाण वाढले आहे. 2023-24 या वर्षात 365 दिवसांपैकी नागरिकांच्या आरोग्यासाठी 79 चांगले दिवस, 145 समाधानकारक दिवस, तर 140 मध्यम दिवस होते. या वर्षी केवळ 1 दिवस खराब होता. मात्र, 2024-25 या वर्षात केवळ 52 दिवस चांगले होते, 137 दिवस समाधानकारक, 174 मध्यम दिवस तर खराब दिवसांची संख्या तीनने वाढली असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात वाहनांची संख्या तीन लाखांनी वाढली आहे. 2023-24 या वर्षात शहरात असलेल्या एकूण वाहनांची संख्या 38 लाख 63 हजार 849 इतकी होती. मात्र, जुलै 2025 पर्यंत ही संख्या 41 लाख 25 हजार 968 झाली आहे. इलेक्ट्रिक, सीएनजी तसेच हायब्रीड वाहनांच्या वापरात वाढ होत असली तरी सर्वांत अधिक वाहने पेट्रोलची असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

सौरऊर्जेच्या वापरात वाढ

सौरऊर्जेच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली असून, 2024-25 मध्ये सौरऊर्जानिर्मितीची क्षमता 1.66 लाख किलोवॉट झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असले तरी, अद्याप हे अपुरेच ठरत आहे.

2022-23 मध्ये शहरामध्ये इमारतीच्या छतावरील बसविण्यात आलेली सौरऊर्जा क्षमतादेखील दुपटीने वाढली आहे. अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, पुणेकरांच्या ऊर्जा वापराचा सर्वाधिक भर निवासी इमारतींवर आहे. जवळपास 61 टक्के ऊर्जा याच विभागामधून वापरली जाते.

Pune News
Panshet Dam Rain Update: पानशेत-वरसगाव परिसरात पावसाचा जोर ओसरला; धरणसाखळीत 88.76 टक्के पाणीसाठा

प्रतिव्यक्ती 2.47 टन कार्बन उत्सर्जन

पुण्यात सध्या सुमारे 2.47 टन प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जन होते, जे खूपच जास्त आहे. शहराच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या दृष्टीने हे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे शहराने स्मार्ट सिटी, हरित शहर आणि सौरऊर्जेचा वापर यामार्फत प्रयत्न सुरू केले असले तरी, हे प्रयत्न अधिक व्यापक पातळीवर राबविले जाणे आवश्यक आहे.

शहरात एकूण 13 कचरा प्रकल्पातून 1440 मेट्रिक टन सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते, तर 6 प्रकल्पातून 1105 मेट्रिक टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. बायोमायनिंग प्रकल्पातून 2021-22 मध्ये फेज 1 अंतर्गत 11.76 लाख टन व फेज 2 मध्ये 2023 मध्ये 8 लाख मेट्रिक टन असे एकूण 19.97 टन कचर्‍याचे बायोमायनिंग करण्यात आले आहे, तर 2024-25 मध्ये फेज 3 मध्ये 10 लाख मेट्रिक टनाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

‘पीएमपीएमएल’ने 7 हजार टन कार्बन उत्सर्जन कमी

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक म्हणून पीएमपीच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. 2023-24 मध्ये पीएमपीच्या ताफ्यात एकूण 1 हजार 887 बस होत्या. यातील 473 इलेक्ट्रिक, तर 1 हजार 187 सीएनजी बस होत्या, तर 2024-25 मध्ये एकूण बस 1961 असून, यात 490 इलेक्ट्रिक व 1 हजार 244 सीएनजी बस होत्या. या बसमुळे 7000 टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. या गाड्यांनी गेल्या वर्षात तब्बल 5 कोटी किमी प्रवास केला आहे.

वाढती वाहने प्रदूषणाला ठरली कारणीभूत

शहरातील विजेचा वापर आणि औद्योगिक गरजा, व्यावसायिक इमारती आणि घरगुती वापरामुळे स्थिर ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीकडे, वाढती वाहने हे दुसर्‍या क्रमांकाचे मोठे प्रदूषण करणारे स्रोत आहेत. 2025 पर्यंत पुण्यात वाहनांची एकूण संख्या 41 लाखांहून अधिक झाली आहे, यात इलेक्ट्रिक, सीएनजी, डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news