

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या गैरकारभाराबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना एक पत्र देत विद्यापीठात होत असलेले गैरकारभार थांबविण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. वैद्य यांनी दिलेल्या पत्रानुसार, नगर आणि नाशिकच्या उपकेंद्रांच्या बाबतीत कुलगुरू आणि काही झारीतल्या शुक्राचार्यांची भूमिका आकस, द्वेष भावनेतून सुरू आहे असं दिसतंय. त्यामुळे नाही म्हणायचं नाही आणि करायचं काहीच नाही, अशी आपली कार्यपद्धती दिसून येत आहे, याबद्दल आमची तीव्र नाराजी आहे.
विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या ठरावांना केराची टोपली दाखवत विद्यापीठ कायद्याचा भंग करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. विरोध केलेले वादग्रस्त ठराव मंजूर करून घेतल्याचे दाखवून सभागृहाची फसवणूक केली जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या विभागांना कोट्यवधींचा निधी वाटला जातो आहे. सोयीने सभा घ्यायच्या आणि सोयीने त्यातील विषयांना विरोध असला तरी मंजुरी घ्यायचा प्रकार सुरू आहे.
विद्यापीठ कामासंदर्भातील अनेक फाईल्स आपल्याकडे अनेक महिने प्रलंबित राहात आहेत. कॅस, प्राध्यापक भरती, नेट-सेट स्क्रुटीनी, प्रमाद समितीसह अनेक समितीचे विषय 3- 4 महिने होऊनही प्रलंबित राहतात. अनेक प्रकारची कामे करून घेण्याची विद्यापीठातील ठेकेदारी देण्याची पद्धत सदोष आहे. काही ठराविक ठेकेदार पोसण्याचा उद्योग विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठ महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य ठेवण्यासाठी नोटीस पाठवत आहे. मात्र, विद्यापीठातील डीन, कुलसचिवांसारखी पदे अनेक महिन्यांपासून प्रभारी आहेत. अनेक विभागांत एका-एका अधिकार्यावर 3-3 विभागांचे पदभार आहेत, यावर काहीही ठोस उपाययोजना करण्याचे प्रयत्न आपल्याकडून होताना दिसत नाहीत.
या सर्व विषयांवरील नाराजी मी आपणास या पत्राद्वारे व्यक्त करीत आहे. हे विद्यापीठ लाखो विद्यार्थी आणि शेकडो संस्थांचे आहे. कुणा एक- दोघांच्या मालकीचे नाही. त्यामुळे आपण पालकांच्या भूमिकेत असावे, मालकाच्या नव्हे…! भविष्यात यात सुधारणा दिसली नाही तर नाईलाजाने मला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल. त्या वेळी या प्रत्येक मुद्द्यावरील सखोल पुरावे आणि कागदपत्रे आम्ही जाहीरपणे समाजासमोर ठेवू, असा इशारादेखील वैद्य यांनी दिला आहे.
हेही वाचा