

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोथरूड भागातील रामबाग कॉलनीच्या हॉटेल पालवीच्या मागे टेकडीवर जाणार्या पायर्या लगतची भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेकडीवर जाणार्या पायर्यालगतची भिंत मातीचा भार जास्त झाल्याने गुरूवारी (दि.26) संध्याकाळी नऊच्या सुमारास कोसळल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. अग्निशमन विभागाला माहिती समजताच कोथरूड अग्निशमनच्या अधिकारी व जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पुर्वी स्थानिकांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले होते. अग्निशमनच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली, मात्र त्यांना इतर कुणीही व्यक्ती ढिगार्याखाली असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच भिंतीखाली आणखी कुणी नसल्याचे अग्निमशनच्या अधिकार्यांनी जखमी व्यक्तीच्या मार्फत खात्री केली. जखमीच्या डोक्याला, पाठीला, हाताला मार लागला आहे.
जवळपास वीस ते पंचवीस फूट लांब भिंतीचा भाग कोसळला असून आणखी काही भिंत पडण्याची शक्यता अग्निशमनचे अधिकारी गजानन पाथरूडकर यांनी दिली. सध्या भिंत एका विद्युत खांबाला अडकून राहिली आहे. महापालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाला माहिती कळवून सर्व भिंत काढून घेण्यास अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा