

Puja Khedkar Navi Mumbai Road Rage :
वादग्रस्त माजी आएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबिंयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवी मुंबई रोड रेज प्रकरणी ट्रक ड्रायव्हरचं अपहरण प्रकरणात पोलिसांनी धुळ्यातून पूजा खेडकर कुटुंबियांचा ड्रायव्हर प्रदीप साळुंखे याला अटक केली आहे.
नुकसान भरपाईच्या वादातून दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक अन् ड्रायव्हर प्रदीप साळुंखे यांनी मिक्सर चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पुण्यातील त्यांच्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. नवी मुंबई पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली होती.
नवी मुंबई पोलिसांनी 4 पथके स्थापन करून, खेडकरचा ड्रायव्हर साळुंखे याला काल सकाळी रबाळे पोलिसांनी धुळ्यातील सिंदखेडा येथून अटक केली आहे. दरम्यान पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर आणि पुरावे नष्ट करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
मुलुंड-ऐरोली मार्गावर झालेल्या सिमेंट मिक्सर ट्रक आणि Land Cruiser कारच्या अपघातानंतर, दोन अज्ञात आरोपींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून पुण्याकडे रवाना केले होते. ट्रक चालकाच्या माहितीवरून रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तपासात MH 12 RP 5000 क्रमांकाची गाडी ही पूजा खेडकर यांच्या वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीची असल्याचे समोर आले.
गाडी पुण्यातील बाणेरमध्ये बंगल्यासमोर आढळली, परंतु पोलिसांनी तपासासाठी पोहोचल्यावर दिलीप खेडकर आणि पत्नी मनोरमा खेडकर हे दोघेही फरार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालक प्रदीप साळुंखे याला सिंदखेड, धुळे येथून अटक केली असून त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या अपहरणासाठी वापरलेली गाडी अजूनही ताब्यात नाही. पोलिसांकडून फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा शोध सुरु आहे. अपहरणाच्या या गंभीर प्रकारामुळे खेडकर कुटुंबीय पुन्हा चर्चेत आले आहेत.
दरम्यान, ज्यावेळी खेडकर कुटुंबियांच्या पुण्याच्या घरी दोन जेवणाचे डबे संशयितरित्या आत घेऊन जात होते त्यावेळी पोलिसांना पूजा खेडकरचे कुटुंबीय घरात असल्याचा संशय आला होता. त्यावेळी त्यांनी घरात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील कुत्रे पोलिसांच्या अंगावर सोडण्यात आले. यानंतर पोलिसांनी पूजा खेडकर कुटुंबियांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.