Pudhari Majha Bappa: बाप्पाची मूर्ती साकारण्यात विद्यार्थी दंग...

पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला आनंद; पीएम श्री केंद्रीय विद्यालयात रंगली अनोखी कार्यशाळा
Pudhari Majha Bapp
बाप्पाची मूर्ती साकारण्यात विद्यार्थी दंग...Pudhari
Published on
Updated on

पुणे: विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील उत्साह ओसंडून वाहत होता... ना त्यांना वेळेचे भान राहिले होते, ना हात मातीने भरले म्हणून आईचा ओरडा खाण्याची भीती होती... ना होमवर्कचा ताण होता, ना क्लास वर्कचा... प्रत्येक विद्यार्थी रंगला होता ‘माझा बाप्पा’ बनविण्यात..! श्री गणेशाचे बलशाली हात, हत्तीसारखी सोंड, सुपासारखे कान बनविल्यावर विद्यार्थी स्वतःच्याच कलेवर हरखून जात होते. यावर्षी हाच बाप्पा आमच्या घरात विराजमान होणार, असे सांगताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. निमित्त होते शाडूच्या मातीपासून श्री गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे..!

दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाची स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे विद्यानगरमधील पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले होते. (Latest Pune News)

Pudhari Majha Bapp
Khadakwasla Dam: ‘खडकवासला’चा विसर्ग 14 हजार 429 क्युसेकवर

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची मूर्ती घडविण्यासाठी भारती विद्यापीठ कला महाविद्यालय कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीची मूर्ती यामधील फरक प्रात्यक्षिकांद्वारे दाखविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असून, त्यांचे घरीच विसर्जन करता येऊ शकते. तसेच, ही माती बागकामात वापरताही येणार आहे. शाळेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. रेणुका चलवादी यांनी उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या उपप्राचार्या जयश्री कदम, प्रशासक सायली शिंदे आणि शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमात शाळेतील सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.

पीएम श्री केंद्रीय विद्यालयात रंगली अनोखी कार्यशाळा

‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’चा आवाज औंधमधील पीएम श्री केंद्रीय विद्यालय गणेशखिंड येथे दुमदुमला. जवळपास 189 चिमुकल्यांनी आपल्या हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती बनवली. मूर्ती बनवून झाल्यावर या चिमुकल्यांनी एकच जल्लोष केला, ‘गणपती बाप्पा’च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय केले. शाडू मातीच्या बनविलेल्या मूर्ती आनंदाने घरी घेऊन जाताना या मुलांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच हर्षोल्हास दिसून येत होता. गणपती बाप्पांनी जणू मूर्ती बनवतानाच त्यांच्यात पर्यावरणरक्षणाची ही जडणघडण करीत असल्याचे चित्र या वेळी पाहावयास मिळाले.

दै. ‘पुढारी’तर्फे ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणपूरक स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन औंधमधील श्री पीएम केंद्रीय विद्यालयात केले होते.

Pudhari Majha Bapp
Hotel Pubs Regulation: हॉटेल अन् पब्जच्या शिस्तीसाठी पोलिसांकडून समिती

या कार्यशाळेत स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची मूर्ती घडविण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या वेळी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्टचे प्राध्यापक सुनील देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विद्यार्थिसंख्या जास्त असूनही विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक गणेशमूर्ती बनविल्या. बनविलेल्या प्रत्येक गणेशमूर्तीमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या कलेची व बाप्पाबाबतची असलेली भक्ती दिसून आली. या वेळी शाळेचे प्राचार्य अविजित पांडा, मुख्याध्यापिका सुरेखा नरके, अलीम बागवान, सुभाष बनसोडे, के. आनंद आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शाडू मातीची मूर्ती घरी पाण्यात विसर्जित करता येते. त्यामुळे पर्यावरणसंवर्धन होऊन श्री गणेशाचे पावित्र्य राखता येते. पर्यावरणसंवर्धनासाठी दै. ‘पुढारी’ने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. शाडू मातीच्या मूर्तींमुळे नदीप्रदूषणाला आळा घालता येईल. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यात खारीचा वाटा उचलता आला. शाडू मातीची श्री गणेशमूर्ती बनविण्याचा उपक्रम पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये राबविल्याबद्दल दैनिक ‘पुढारी’चे आभार.

- डॉ. हुलगेश चलवादी, अध्यक्ष, पुणे इंटरनॅशनल स्कूल

गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेमुळे मुलांना स्वतःच्या हाताने मूर्ती बनविण्याचा आनंद घेता आला. शाडू जलदगतीने पाण्यात विरघळत असल्याने गणेशमूर्तीचे पावित्र्य राखत मूर्ती विसर्जित करणे शक्य आहे. त्यामुळे कुठेही गणेशमूर्ती पाण्यावर तरंगताना दिसणार नाही. उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल पुणे इंटरनॅशनल स्कूलतर्फे दैनिक ‘पुढारी’ आणि भारती विद्यापीठाचे आभार.

- स्मिता लोंढे, प्राचार्या, पुणे इंटरनॅशनल स्कूल

दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी आपण कसे जोडून घेऊ शकतो, याचा धडा मिळाला असून, हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने आहे. हा असा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी निगडित असलेला पर्यावरणपूरक स्तुत्य उपक्रम दै. ‘पुढारी’ राबवत असल्याची बाब खूप कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी पर्यावरणाशी जोडले जातील.

- अविजित पांडा, प्राचार्य, पीएम श्री केंद्रीय विद्यालय

सध्या सर्वत्र पर्यावरणाचा र्‍हास आणि विनाश होत आहे. बर्‍याचदा उत्सव साजरे करताना कळत-नकळत पर्यावरणाचे भान ठेवले जात नाही. अशा वातावरणात पर्यावरणसंवर्धन आणि पर्यावरणसंवेदन जपत उत्सव साजरे करणे दुर्मीळच होत आहे. त्यामुळे शाळेत असे उपक्रम साजरे करणे, हे नक्कीच महत्त्वाचे आहे आणि यासाठी लाडका गणपती बाप्पा बनविण्यापासून याची सुरुवात होत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून मुलांना सर्जनशीलतेबरोबरच अनुभवात्मक शिक्षणाची जोड मिळेल. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’च्या अंतर्गत अनुभवात्मक शिक्षण आणि कोशल्यविकास यांना महत्त्वाचे स्थान आहे.

- सुरेखा नरके, मुख्याध्यापिका, पीएम श्री केंद्रीय विद्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news