खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत- मुठा खोर्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी (दि. 21) सकाळपासून ओसरला.
त्यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग सायंकाळी सहा वाजता 17 हजार 429 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. धरणसाखळीत सायंकाळी 27.71 टीएमसी (95.07 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. (Latest Pune News)
पानशेत धरणामधून सध्या 2 हजार 856 , वरसगावमधून 7 हजार 187 आणि टेमघर धरणामधून 2 हजार 639 क्युसेक पाणी सोडले जात आहे. या पाण्यासह धरणक्षेत्रातील पाण्याची भर खडकवासला धरणात पडत आहे.
गुरूवारी दिवसभरात टेमघर येथे 15, खडकवासला येथे 3, पानशेत येथे 8 आणि वरसगाव येथे 9 मिलिमीटर पाऊस पडला. सकाळपासून रिमझिम पाऊस आणि श्रावण सरी पडत आहे. तसेच अधूनमधून पाऊस उघडीप देत आहे त्यामुळे मोसे, आंबी आणि मुठा नद्यांसह ओढ्यां नाल्यांतील पाण्याची आवक बुधवारपेक्षा (दि.20) निम्म्याहून कमी झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी चारही धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण असून जोरदार वारे वाहत आहे.
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर -फुटाणे म्हणाल्या की, गुरूवारी सकाळपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सर्व चारही धरणांतील विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून पुन्हा पाणी सोडले जाणार आहे.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
गुरुवारचा पाणीसाठा
27.71 टीएमसी (95.07 टक्के)