शेतकर्‍यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्या : डॉ. देशमुख

शेतकर्‍यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्या : डॉ. देशमुख
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊन या वर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकर्‍यांचा होणारा पिकांवरील उत्पादन खर्च कमी करून पिकांची उत्पादकता वाढविण्याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावेत. कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासावी तसेच पुरेसा पुरवठा करावा. शेतकर्‍यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, 'पीएम किसान' योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांची प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत अभियानस्तरावर पूर्ण करावी, त्यासाठी गावनिहाय याद्या तयार कराव्यात. शेतकर्‍यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात ऊस पिकाचे क्षेत्र विचारात घेता उत्पादकता वाढविण्यासाठी हुमणी नियंत्रण कार्यक्रम, ऊस पाचट अभियान यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाशी निगडीत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेतकर्‍यांना लाभ देण्यावर भर द्यावा. कारेगावकर म्हणाले, या वर्षी 4 लाख 32 हजार 882 खातेदारांना 4 हजार 259 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तीस हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तृणधान्ये 1 लाख 30 हजार 456 हेक्टर, गळीत धान्ये 2 लाख 13 हजार 406 हेक्टर, कडधान्ये 26 हजार 690, नगदी पिके 67 हजार 496 हेक्टरवर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. 30 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्याप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. खतांचे 2 लाख 2 हजार 450 टन आवंटन असून 93 हजार 337 टन खते उपलब्ध आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी सांगितले.

227 कोटी रुपयांचे उद्दिष्ट

कृषी व संलग्न प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, शैक्षणिक सहली, शेतीशाळा, प्रदर्शने आदी बाबींसाठी 2022-23 या वर्षात 333 कोटी 79 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून 328 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सन 2023-24 या वर्षात 227 कोटी 37 लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आल्याचे विजय हिरेमठ यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news