तळेगाव ढमढेरे: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कामगाराला त्रास झाल्यानतर कंपनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रामपाल सताई दुशद या कामगाराचा मृत्यू झाला.
त्यामुळे अन्य कामगार व नातेवाईकांनी रविवारी (दि. 22) सकाळच्या सुमारास मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. (Latest Pune News)
शिक्रापूर येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रामपाल दुशद हा कायमस्वरूपी कामगार आहे. सोमवारी (दि. 16) कामावर असताना दुशद याची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिका नसल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी एक तास उशीर झाला.
परिणामी रामपालची प्रकृती गंभीर झाली. त्याला उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अखेर शनिवारी (दि. 21) रात्रीच्या सुमारास रामपालचा मृत्यू झाल्याने अन्य कामगार व नातेवाईक संतप्त झाले. त्यामुळे रविवारी (दि. 22) सकाळच्या सुमारास कामगार व नातेवाईकांनी रामपालचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
दरम्यान कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी सुरू होताच सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस हवालदार संदीप कारंडे, दामोदर होळकर, महिला पोलिस कर्मचारी पल्लवी वाघोले यांनी घटनास्थळी भेट देत कामगार व नातेवाईकांशी चर्चा करत घटनेबाबत तक्रार द्या, आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिले. त्यानंतर अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मृत कामगारावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी कामगारांनी कंपनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे कंपनी प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी एकमेकाकडे बोट दाखवत बोलणे देखील टाळले. भाजपाचे तालुकाध्यक्ष जयेश शिंदे व क्रांतिवीर प्रतिष्ठान सणसवाडीचे अध्यक्ष सागर दरेकर यांनी कंपनीमध्ये भेट देत कंपनीमध्ये 400 कामगार असताना एकही रुग्णवाहिका नसल्याने नाराजी व्यक्त करत कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले.
कंपनीने पोलिसांना माहिती देणे टाळले
शिक्रापूर येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामगार व नातेवाईकांनी कंपनीच्या गेटवत मृतदेह आणून ठेवत आंदोलन सुरू केले तरीही तासभर कंपनी प्रशासनाने चक्क पोलिसांना माहिती देणे देखील टाळल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
शिक्रापूर येथील कंपनीसमोर घडलेल्या प्रकारानंतर आम्ही तातडीने भेट देऊन कामगार व मयताचे नातेवाईक यांच्याशी चर्चेनंतर अंत्यविधी पार पडला. मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- राहुल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, शिक्रापूर