खेड शिवापूर: शिवगंगा खोर्यातील वारकरी श्री सोपानकाका पालखी सोहळ्यात जाण्यासाठी सासवड येथे जात असतात. मात्र, या वर्षी त्यांना चिखल तुडवत जावे लागले. खेड शिवापूर फाटा (ता. हवेली) ते कासुर्डी (ता. भोर) व पुढे गराडे (ता. पुरंदर) या तीन तालुक्यांना जोडणार्या रस्त्यात तळे की तळ्यात रस्ता? अशी अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे झाली आहे.
खेड शिवापूर फाटा ते कासुर्डी दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरण 1996 ते 97 मध्ये करण्यात आले, तेव्हापासून वेळोवेळी सदर रस्त्याची नावापुरती डागडुजी झाली. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट होत आहे. त्याचा त्रास यंदा वारकर्यांना झाला. या भागातील नागरिकांना दररोजच त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Pune News)
गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना रस्ता दुरुस्तीची विनंती केली. या रस्त्याने वारकरी जातात असे सांगूनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. या ठिकाणी रोजच अपघात होत आहेत. मात्र, संबंधित प्रशासन सुस्त असल्याचे कासुर्डी खे. बा. गावचे सरपंच अतुल कोंडे यांनी सांगितले.
खेड शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होते त्यावेळी त्यांनी सेवारस्ता खोदला होता. त्यामुळे काम सासवड बाजूने सुरू केले. रस्त्यावरील खांब काढण्यासाठी मंजुरी लागते. त्यामुळे वेळ लागला. या रस्त्याचे काम मेमध्ये करण्याचे ठरवले होते. मात्र, पावसामुळे काम रखडले. पाऊस थांबला की या रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे बांधकाम विभागाचे अधिकारी ओंकार रेलेकर यांनी सांगितले.