

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव बुद्रुक परिसरातील देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे. काही महिला व मुली या मार्गावर सेवा रस्त्यावर उभ्या राहून वेश्या व्यवसाय करीत आहेत. यामुळे परिसरातील रहिवासी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. या गैरप्रकाराचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी स्थानिक महिला, नागरिक व मनसेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
बाह्यवळण मार्गावर स्पेलंडर रेसिडेन्सी, लोटस रेसिडेन्सी आणि मोक्षांगण सोसायटीसारख्या अनेक मोठ्या सोसायट्या आहेत. गजबजलेल्या भागात बाह्यवळण मार्गावर काही महिला व मुली रस्त्यावर उभ्या राहून वेश्या व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत सोसायट्यांतील महिला व नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिसही वारंवार कारवाई करत आहेत.
मात्र, कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा वेश्या व्यवसाय करणार्या महिला या रस्त्यावर उभ्या राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर हे गैरप्रकार सुरू आहेत. यामुळे रहिवासी महिलांना परिसरात राहणे अवघड झाले आहे. वेश्या व्यवसाय करणार्या महिला इथे थांबतात. त्यामुळे सोसायटीतील महिलांना त्रास होत असून, या गंभीर समस्येकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महामार्गावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती महिलांकडून मिळाली. त्या अनुषंगाने संबंधित लॉजधारकांना निवेदन दिले. यापुढे असे गैरप्रकार आढळल्यास मनसे स्टाईलने खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटदेखील बंद असून, त्या चालू करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.
-वसंत मोरे, माजी नगरसेवक
पोलिसांकडून बाह्यवळण मार्गावर गस्त घालण्यात येत आहे. वेश्या व्यवसायासह अन्य गैरप्रकारांबाबत संबंधित लॉज व हॉटेल चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच काही हॉटेल चालक व देहविक्रय करणार्या महिलांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. महापालिकेने परिसरातील पथदिवे तातडीने सुरू करावेत.
-विजय कुंभार,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे
हेही वाचा