पुणे : पालखी महामार्ग, रेल्वे भूसंपादनामुळे ‘समृद्धी’

पुणे : पालखी महामार्ग, रेल्वे भूसंपादनामुळे ‘समृद्धी’
Published on
Updated on

अनिल सावळे-पाटील

जळोची : संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व रेल्वेमुळे बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांत समृद्धी येऊन जीवनमान उंचावणार आहे, तसेच दळणवळणाचाही वेग वाढणार आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांत विकासाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांनी वेग पकडला आहे. भूसंपादनाचीदेखील कामे वेगाने झाली आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. पालखी महामार्गाच्या भूसंपादनापोटी तीन तालुक्यांत मिळून आतापर्यंत 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप शासनाकडून झालेले आहे. पाटस ते बारामती या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 424 कोटी रुपये वितरित केले आहेत.

बारामती तालुक्यातील कण्हेरी ते इंदापूर या टप्प्यासाठी 314 कोटी, तर इंदापूर तालुक्यातील वडापुरी ते सराटी या मार्गासाठी 168 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तिन्ही टप्प्यांसाठी 1236 कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहे. त्यापैकी 907 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे. बारामती ते फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 186 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. अजून 50 कोटी रुपये महसूल विभागाकडे शिल्लक आहेत.

रेल्वे भूसंपादन प्रक्रिया आगामी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आता सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. 186 हेक्टरपैकी 134 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. बारामती पंचक्रोशीत भूसंपादनापोटी आलेल्या रकमेतून अनेकांनी शेती, शहरालगत अकृषक जमीन खरेदी, सदनिका, व्यापारी गाळे, सोने खरेदीसह वाहन खरेदी केली आहे. अनेक शेतकर्‍यांना पैसे मिळाल्याने जमिनीच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. परिणामी, बाजारपेठेतही गर्दी बघायला मिळाली.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनानंतर बाजारात मंदी होती. मात्र, भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याने शेतकर्‍यांना फार फटका बसला नाही. अशातच 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप झाल्याने शेतकरी सधन झाले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी प्लॉटिंगही केले आहेत. त्यामुळे जमिनीला चांगली किंमत आली आहे. मात्र, बायपास रस्ता जाणार्‍या मार्गावरील भूसंपादनाचा शेतकर्‍यांना कमी मोबदला मिळाला आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांनाही इतर शेतकर्‍यांप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी होत आहे. ?

संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी दौंड, इंदापूर, बारामती भागांत भूसंपादन
शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या बदल्यात चांगले पैसे मिळाले आहेत.

बारामती, फलटण रेल्वेमार्गासाठीही शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळणार आहे.

ज्या ठिकाणी कुसळ उगवत नव्हते, त्या ठिकाणी जमिनीला उच्च भाव मिळाला. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकरी बंगले बांधतात, चारचाकी घेतात, मुलांना उच्च शिक्षण देत आहेत. हा बदल पालखी महामार्ग व रेल्वेमार्गाच्या भूसंपादनामुळे दिसत आहे.
                                                                     – दादा चौधर, माजी सरपंच

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news