

कोंढवा: गेल्या काही महिन्यांपासून महंमदवाडी येथील कृष्णानगर-सारसबाग बससेवा पीएमपी प्रशासनाने कोणतेही कारण न देता बंद केली आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची परवड सुरू आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तरी ही बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्ता आणि प्रवासीही मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत; मग बस सुरू होण्यास अडचण काय? असा सवाल या भागातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. (Latest Pune News)
गेल्या पाच वर्षींपूर्वी कृष्णानगर परिसरातून पीएमपीएलची बस स्वारगेटपर्यंत धावत होती. यामुळे सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांची सोय होत होती, परंतु पीएमपी प्रशासनाने अचानक ही बससेवा बंद केली. तसेच परिसरातील सुशोभीत बसथांबे देखील रात्रीत गायब केले. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सुस्त प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. यामुळे कृष्णानगर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी बससेवेपासून वंचित आहेत.
राज्याच्या विविध भागातून रोजगारासाठी आलेले नागरिक कृष्णानगर, गणेशनगर, लक्ष्मीनगर, हेवन पार्क या भागात राहतात. परिसराची लोकसंख्या जवळपास 25 हजार आहे. या भागातील नागरिक आणि विद्यार्थी कोंढवा, वानवडी, स्वारगेट, पुणे स्टेशन आणि हडपसर येथे जातात. परंतु सध्या या ठिकाणी पीएमपी बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी वाहने अथवा रिक्षा करून साळुंखे विहार किंवा तरवडेवस्ती येथे जाऊन बस पकडावी लागत आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी कृष्णानगर परिसरातील नागरिकांसाठी पीएमपी बससेवा उपल्बध करून दिली होती. यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली होती, परंतु पीएमपी प्रशासनाने अचानक ही बससेवा बंद केली.
महंमदवाडी स्मशानभूमीपासून हेवन पार्कदरम्यान जागोजागी असलेले बसथांबे देखील रात्रीत गायब करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिक पीएमपी सेवेपासून वंचित आहेत. याबाबत पीएमपीचे आधिकारी सतीश गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
कृष्णानगर येथे पीएमपी बससेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरच विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.
- प्रमोद भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)
पीएमपीने ही बससेवा बंद का केली? तसेच बसथांबे का काढले? याबाबत प्रशासनाकडे विचारणा करणार आहे. तसेच ही बससेवा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- विजया वाडकर, माजी नगरसेविका