

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सार्वजनिक ग्रंथालयांची आर्थिक स्थिती सावरत आहे. त्यामुळेच आता ग्रंथालयांच्या नवीन पुस्तकांच्या खरेदीलाही चालना मिळाली असून, सार्वजनिक ग्रंथालये सध्याला नवीन पुस्तक खरेदीवर भर देत आहेत. पुस्तकांची खरेदी ग्रंथालयांमार्फत टप्प्याटप्प्याने होत आहे. वेळेवर मिळणार्या शासकीय अनुदानामुळे हे शक्य झाले आहे. काही ग्रंथालयांनी 80 हजार ते 1 लाख रुपयांची, तर काही ग्रंथालयांनी दोन ते अडीच लाख रुपयांची पुस्तक खरेदी केली आहे.
दरवर्षी ग्रंथालयांकडून दोन टप्प्यांमध्ये नवीन पुस्तके विकत घेतली जातात. वाचकांना आवडणारी आणि भावणारी नवीन पुस्तके ग्रंथालयांचा भाग बनतात. शासकीय अनुदानातून ही पुस्तक खरेदी होते, ते करणेही शासकीय नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. अनुदानातील एक विशिष्ट रक्कम त्यासाठी खर्च करणे बंधनकारक असते. त्यादृष्टीने दरवर्षी नियमानुसार ग्रंथालयांकडून नवीन पुस्तकांची खरेदी केली जाते. परंतु, गेल्या अडीच वर्षांत अनुदान मिळण्यात सातत्य नसल्यामुळे आणि ग्रंथालये आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे पुण्यातील बहुतांश ग्रंथालयांची नवीन पुस्तक खरेदी रखडली होती. परंतु, आता आर्थिक फटक्यातून ग्रंथालये सावरत असून, नवीन पुस्तक खरेदीही केली जात आहे.
नवीन पुस्तक खरेदी हा ग्रंथालयातील महत्त्वाचा भाग आहे. कोरोना काळात नवीन पुस्तकांची खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही. पण, आता चित्र बदलत आहे. नवीन पुस्तके प्रकाशित होतात, त्यानुसार प्रकाशक आणि वितरक ग्रंथालयांशी संपर्क साधतात. त्यातील काही पुस्तके ग्रंथालयाच्या ग्रंथ निवड समितीमार्फत निवडली जातात आणि ती नवीन पुस्तके खरेदी केली जातात. आम्ही चार ते पाच हजार पुस्तके खरेदी केली असून, अनुदानातील विशिष्ट रक्कम त्यासाठी खर्च करीत आहोत.
– धनंजय बर्वे, अध्यक्ष, पुणे मराठी ग्रंथालय
सध्यातरी शासकीय अनुदान मिळण्यात सातत्य आले आहे. त्यामुळे ग्रंथालयांना विशिष्ट रक्कम खर्च करता येत असल्याने नवीन पुस्तक खरेदीची गाडीही रुळावर आली आहे. आम्ही ग्रंथालयांसाठी सुमारे 80 हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली आहेत.
– दिलीप भिकुले, ग्रंथपाल, सिद्धार्थ वाचनालय