

पन्नास हजार धनगरी ढोल वाजवुन करणार विश्वविक्रम
पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री यांची उपस्थिती
आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती
Gopichand Padalkar पुणे : पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त हिंदुस्थान शिव क्रांती तर्फे 50 हजार धनगरी गजी ढोलांचे एकत्रीत वादन करून विश्व विक्रम करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 31 मे 1725 रोजी चौंडी येथे जन्म झाला. महिला राज्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य जगात उल्लेखनीय आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध उपक्रम राज्यभरात करण्यात येणार आहे. धनगर समाज याकडे ज्या परंपरा, चालीरीती आहे त्या अफलातून आहे. ’धनगरी रुद्र नाद उपक्रमांतर्गत मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात रेसकोर्स मैदानावर 50 हजार धनगरी गजी ढोलांचे एकत्रित वादन करून विश्व विक्रम केला जाणार आहे. या वादनाच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांना अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेत्यांची उपस्थिती असणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
पडळकर म्हणाले, या उपक्रमात राज्यभरातून 500 गजनृत्य व गज ढोल पथके सहभागी होणार आहेत. यावेळी ओवी सादरीकरण होणार आहे. ज्या घरात, मंदिरात ढोल आहे, तो वादनासाठी पुण्यात आला पाहिजे, ज्यांच्याकडे ढोल नाही त्यांना ज्यांची देण्याची क्षमता आहे, त्यांनी द्यावा, असे आवाहन पडळकर यांनी केले.
विश्व विक्रमाच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री शहा, मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमासाठी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत का, असा प्रश्न विचारल्यानंतर पडळकर यांनी अजित पवारांना बोलवणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही तर समाजाचा कार्यक्रम आहे, असे म्हणत त्यांनी याविषयावर अधिक भाष्य करणे टाळले.