पहिल्या पिढीच्या बियाणातून ‘इंद्रायणी’चे उत्पादन; शेतकर्‍यांना बियाणांचे वाटप

पहिल्या पिढीच्या बियाणातून ‘इंद्रायणी’चे उत्पादन; शेतकर्‍यांना बियाणांचे वाटप

वडगाव मावळ : मावळ अ‍ॅग्रोच्या माध्यमातून पहिल्या पिढीचे इंद्रायणी भात बियाणे व सेंद्रिय खतांचे सोमवारी (दि. 27) भात उत्पादक शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील 35 शेतकर्‍यांना 1 एकरला 25 किलो याप्रमाणे 1 हजार किलो बियाणांचे वाटप करण्यात आले.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून फार्मटच बायोटेक प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्‍याने व मावळ अ‍ॅग्रोच्या माध्यमातून हा प्रयत्न मावळात करण्यात येत आहे. वडगाव मावळ येथील जिल्हा बँकेच्या कार्यालयात पंचायत समिती माजी सदस्य साहेबराव कारके, बँकेचे अधिकारी नीरज पवार, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, मावळ अ‍ॅग्रोचे अध्यक्ष बाबूराव येवले, बाजार समितीचे संचालक नथू वाघमारे, किसनराव वहिले, बाळासाहेब शिंदे, मधुकर शिंदे, राहुल आहेर, गौरव खांदवे, संदीप साठे आदींच्या हस्ते बियाणांचे वाटप करण्यात आले.

आज पहिल्या पिढीचे बी दिल्यानंतर त्यापासून पुढच्यावर्षी फाउंडेशन म्हणजे दुसर्‍या पिढीचं बी तयार होईल. या दुसर्‍या पिढीपासून तिसर्‍या पिढीच्या बियाणाचे उत्पादन होईल. त्यास सर्टिफाईड बियाणे म्हटले जाईल. असे सर्टिफाईड बियाणे शासनाप्रमाणेच मावळ तालुका नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हयाला मावळ अ‍ॅग्रोच्या माध्यमातून 2027 ला खरीप हंगामात सर्टिफाईड शुद्ध बियाणे वाजवी दरात पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणार आहे.

उत्पादित भाताला मिळणार 45 रुपये प्रतिकिलो भाव

संबंधित पहिल्या पिढीच्या बियाणाद्वारे उत्पादित होणार्‍या भाताला प्रतिकिलो 45 रुपये दराने भाव मिळणार असून, मावळ अग्रोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करून झालेल्या उत्पादित भाताला 35 ते 40 रुपये भाव मिळणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.

येत्या तीन वर्षांत मावळ तालुका इंद्रायणी भाताचे सर्टिफाईड संपूर्ण पुणे जिल्ह्याला पुरवठा करेल. ही मावळच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब असून. इंद्रायणीच्या उत्पादनामध्ये एक दमदार पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकल्याचा अभिमान वाटत आहे.

– माऊली दाभाडे, संस्थापक अध्यक्ष, मावळ अ‍ॅग्रो

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news