पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकत्र येत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या पालखीला खांदा दिला. या वेळी पाटील यांनी स्वतः ठाकरेंशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी आदित्य ठाकरे पुण्यात आले होते.
या वेळी त्यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. महात्मा फुले मंडईत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीला पुष्पहार घालून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. त्यासाठी पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ठाकरे यांनीही हजेरी लावली. कसबा गणपतीची पालखी टिळक पुतळ्यासमोर आल्यानंतर पाटील पालखीला खांदा देण्यासाठी पुढे आले.
त्यानंतर काही क्षणांतच ठाकरे यांची एन्ट्री झाली. ठाकरे आल्याचे पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी आवर्जून पालखी खांदा देण्यासाठी त्यांना पुढे बोलावले. या वेळेस या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन पालखीला खांदा दिला. याच वेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 'गणपती बाप्पा…' अशी घोषणा दिली. त्यावर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी "मोरया" म्हणून प्रतिसाद दिला. एकंदरीतच पुण्याच्या या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे
पुणेकरांनी पाहिले.
दरवर्षी पुण्यात विसर्जनला येणार…
विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी आज गणेशोत्सवाच्या अखरेच्या दिवशी पुण्यात आलो. येथील वैभवशाली विसर्जन मिरवणूक नक्की कशी होते, हे पाहायला मिळाले, याचा मला खूप आनंद होत आहे. आता दर वर्षी मी या विसर्जन मिरवणुकीला आवर्जून येणार आहे.'