पुणे; पुढारी वृत्तसेवा: ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात अन् उत्साहात, आनंदात यंदा मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी (दि.9) निघणार आहे. दोन वर्षांनंतर पुणेकरांना विसर्जन मिरवणूक अनुभवता येणार आहे. मिरवणुकीला अनंत चतुर्दशीला सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून सुरुवात होईल. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाच्या आणि प्रमुख गणपतींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होईल.
चांदीच्या पालखीतून, तसेच फुलांच्या आकर्षक रथातून लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादन, बॅण्डची सुरावट असेल. तसेच, रांगोळीच्या पायघड्याही घालण्यात येतील. गणरायाला निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून, विसर्जन मिरवणुकीसाठीची मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वैभवशाली मिरवणुकीने पुणेकर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत.
…अशी निघणार मिरवणूक
मानाचा पहिला ः श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
गणरायाची विर्सजन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. सकाळी उत्सव मंडपातून विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. गणरायाची आरती झाल्यावर मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता मुख्य मिरवणूक मार्गाकडे मार्गस्थ होईल. मिरवणुकीमध्ये नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके असतील. रमणबाग, रुद्रगर्जना आणि कलावंत ही तीन ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी नेणार आहेत.
मानाचा दुसरा ः श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
गणरायाची विर्सजन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. सकाळी उत्सवमंडपातून श्रींची मिरवणूक महात्मा फुले मंडईच्या दिशेने मार्गस्थ होईल. सतीश आढाव यांचे नगारावादन, पारंपरिक पोशाखात अश्वारूढ कार्यकर्ते, न्यू गंधर्व ब—ास बॅण्ड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथके, पारंपरिक वेशभूषेत मंडळाच्या महिला व पुरुष कार्यकत्र्यांचा सहभाग असेल. विष्णूनाद पथकाचे कार्यकर्ते गणरायाच्या पालखीपुढे शंखनाद करतील. अब्दागिरी, मानचिन्हांसह श्री गणराय विराजमान झालेल्या चांदीची पालखी कार्यकर्ते खांद्यावरून वाहून नेतील.