दिवे: पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, वनपुरी परिसरात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोची बांधणी करण्यात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मजूर टंचाईमुळे इर्जिक पद्धतीने ही कामे करण्याला शेतकर्यांनी प्राधान्य दिले आहे.
उन्हाळी हंगामात 1 मे तसेच पावसाळी हंगामात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. या दरम्यान लागवड झालेल्या टोमॅटोला हमखास बाजारभाव मिळत असतो, असा बर्याच वर्षांचा अनुभव इथल्या शेतकर्यांना आहे. (Latest Pune News)
कारण यादरम्यान वळवाचा पाऊस होत असतो. त्यामुळे या लागवडी पावसात सापडतात. त्यामुळे खेड, नाशिक, सिन्नर या टोमॅटोच्या आगाराचे भरपूर नुकसान होते व त्या तुलनेत पुरंदरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहते. खतांची योग्य मात्रा, वेळेवर योग्य औषध फवारणी करत आपल्या बागा शेतकरी वाचवतात व हमखास बाजारभाव मिळतो.
सध्या दिवे परिसरात टोमॅटोच्या बांधणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. मात्र, मजुरांची टंचाई भासत आहे. टोमॅटो बांधणीसाठी जास्त रोजंदारी द्यावी लागत असल्याने यावर स्थानिक शेतकर्यांनी इर्जीक पद्धतीने टोमॅटोची बांधणीचा पर्याय निवडला असल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी सुनील झेंडे यांनी सांगितले.
टोमॅटोवर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकर्यांनी टोमॅटोच्या फडात कामगंध सापळे अथवा पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यावर चिकटलेल्या माशा पाच सहा दिवसांनी काढून त्यावर ग्रिस अथवा एरंड तेल लावल्यास फळमाशी आटोक्यात येऊ शकते, असे कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप व कृषी सहाय्यक योगेश पवार यांनी सांगितले.