

पळसदेव(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : पळसदेवला पळसनाथ यात्रेनिमित्त भरविलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने हरियाणा केसरी जितेंद्र त्रिपाठी याचा पराभव केला. त्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व यात्रा कमिटीच्या हस्ते प्रकाश काळे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली. दुसर्या क्रमांकासाठी महादेव काळे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली ट्रॉफी देण्यात आली.
पृथ्वीराज पाटील व जितेंद्र त्रिपाठी यांच्यातील लढत चुरशीची झाली. अर्धा तास कुस्ती होऊनही निकाल न लागल्याने यात्रा कमिटीने कुस्ती गुणांवर लावली. त्यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला. महारुद्र काळे विरुद्ध सुहास गोडगे यांच्यात दुसर्या क्रमांकाची लढत झाली. त्यात महारुद्र काळे विजयी झाला. त्याला भगवान महादेव काळे याच्या स्मरणार्थ ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले. मनीष रायते विरुद्ध कालीचरण सोलनकर यांच्यात तिसर्या क्रमांकाची कुस्ती झाली. ती बरोबरीत सोडवण्यात आली. आशिष वावरे विरुद्ध राहुल काळे यांच्यातील लढतीत वावरे विजयी झाला.
पळसनाथ देवाची यात्रा 5 एप्रिल रोजी पालखी,फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांची सलामी देत उत्साही वातावरणात पार पडली. 6 एप्रिलला कुस्त्यांचा आखाडा झाला. आखाड्यास माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, रावसाहेब मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कुस्तीपटु गोविंद पवार, मयूर पाटील, राजू चोरमले, दशरथ डोंगरे, नितीन माने, दीपक जाधव, अमर गाडे, बाळा ढवळे, विलास वाघमोडे, देवबा जाधव, माउली बनकर आदींनी भेट दिली.