

कराड : कराड शहरातील मतदार सुज्ञ आहेत. त्यांनी ठेकेदारशाही व स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवावा. तसेच शहरात सर्वधर्म समभावाची भावना रुजविण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. शहराला परत विकासाच्या रस्त्यावर आणण्यासाठी काँग्रेसलाच संधी द्यावी. विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासह काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी करावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्र. 5 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमित जाधव, निरीक्षक इकबाल अहमद, उमेदवार अर्चनाताई पाटील, योगेश लादे, आनंदराव लादे, प्रदीप जाधव, इंद्रजीत चव्हाण, सौ. मारुलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड शहर हे गेली अनेक वर्षे ठेकेदारांच्या विळख्यात सापडले आहे. यातून मुक्त करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच कराड नगरपालिकेत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत. याआधी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढविली जात होती.
प्रभाग क्र. 5 मधील काँग्रेसच्या अनुभवी उमेदवार अर्चनाताई पाटील या याआधी नगराध्यक्षा राहिलेल्या असून विकासकामांचा ठसा उमटविणाऱ्या लोकप्रिय नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत पक्षाने तरुण आणि तडफदार उमेदवार योगेश लादे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उभे केले आहे. अनुभवी नेतृत्व आणि उत्साही युवकशक्ती अशी भक्कम शक्ती या प्रभागात उतरवलीआहे.
झाकीर पठाण म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतले आहे. यापूर्वी नगरपालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी टक्केवारी करून नगरपालिकेला कशाप्रकारे लुटले हे कराडकरांना चांगलेच माहित आहे. या ठेकेदारांच्या टक्केवारीतून कराडकरांना मुक्त करण्यासाठी मतदारांनी काँग्रेसला साथ द्यावी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये भरभरून विकास कामे केली आहेत. यापुढेही त्यांच्या माध्यमातून कराडच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जाईल.