

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : येथील बाबूरावनगर येथे स्वतःच्या कार्यालयात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन बसलेल्या तरुणाला शिरूर पोलिसांनी अटक केली. त्याला पिस्तूल विकणारा तरुण यालादेखील पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे असा 1 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिले आहे.
स्वप्नील शंकर कुरंदळे (वय 31, रा. विश्व विजय हाईट्स बाबूरावनगर, शिरूर) आणि अरबाज रहिम शेख (वय 21, रा. सय्यदबाबानगर दर्ग्याजवळ, शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत शिरूर पोलिस यांनी दिलेली माहितीनुसार, आगामी कोरेगाव भीमा शौर्य दिन 2023 चे पार्श्वभूमीवर प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत आदेश केले आहे.
दरम्यान, शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदारांकडून रविवारी (दि. 25) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास माहिती मिळाली, की बाबूरावनगर येथील विश्वविजय हाईट येथील स्वप्नील शंकर कुरंदळे हा त्याचे कार्यालयात विनापरवाना गावठी पिस्टल जवळ बाळगून बसलेला आहे.
ही माहिती मिळतात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तत्काळ पोलीस पथक तयार करून बाबूरावनगर येथे पाठवून स्वप्नील कुरुंदळे याच्या कार्यालयातून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. या वेळी त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, असा 1 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. याबाबत त्यांची चौकशी केली असता, त्याने हे पिस्टल अरबाज
रहिम शेख याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितल्याने अरबाज शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिरूर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस हवालदार सुद्रिक, पोलिस नाईक जगताप, पोलिस जवान हाळनोर, थोरात यांनी केली.