

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत चर्होली, बोर्हाडेवाडी व रावेत या तीन गृहप्रकल्पांत 3 हजार 664 सदनिका बांधण्यात येत आहेत.
त्या सदनिकांची लॉटरीही काढून वर्ष झाले. लाभार्थ्यांकडून स्वहिस्साही भरून घेतला जात आहे. मात्र, रावेत येथील जागेचा ताबा अद्याप न मिळाल्याने काम बंद पडले आहे. परिणामी, 934 लाभार्थ्यांना आणखी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गृहप्रकल्पांसाठी 11 जानेवारी 2021 ला अचानक रद्द झालेली सोडत 27 फेबु्रवारी 2021 ला काढण्यात आली. लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून त्यांच्याकडून 10 टक्के स्वहिस्सा त्याचवेळी भरून घेण्यात आला.
चर्होलीसाठी 40 टक्के दुसरा स्वहिस्सा आणि बोर्हाडेवाडीसाठी 80 टक्के दुसरा स्वहिस्सा 15 एप्रिल 2022 पर्यंत भरून घेण्यात येत आहे.
बोर्हाडेवाडीतील 2 इमारतीचे काम पूर्ण झाले असून, त्याला रंग दिला जात आहे. लवकरच त्या सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. जसजसा इमारती पूर्ण होतील, तसे सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. दोन्ही गृहप्रकल्पाचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
रावेत गृहप्रकल्प जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. जलद सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तेथील काम 30 मे 2019 ला सुरू झाले.
मात्र, उच्च न्यायालयाने कामास स्थगिती दिल्याने ऑक्टोबर 2020 पासून काम बंद आहे. तेथे केवळ फाउंडेशनचे प्राथमिक काम झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेत गृहप्रकल्प अडकून पडला आहे.
तेथील 934 लाभार्थ्यांची यादी तयार होऊन वर्ष लोटले. सर्वसामान्य नागरिक घराची आस लावून बसले आहेत. त्यांना घराची चावी मिळण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर किमान दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थी नाराजी व्यक्त करीत आहेत.
सदनिकासाठी बँकेकडून कर्ज प्रकरण करावे लागते. त्यासाठी वेतन किंवा व्यवसायाची असंख्य कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्याकरीता लाभार्थ्यांना खूपच धावाधाव करावी लागत आहे.
अनेकांकडे उत्पन्नांची कागदपत्रे नसल्याने कर्ज प्रकरणास अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, घरकुल व इतर प्रकल्पातील बराच लाभार्थ्यांनी बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने नामवंत व राष्ट्रीयकृत बँका पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज नाकारत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
खासगी तसेच, प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पात तयार सदनिका (सँपल प्लॅट) दाखविला जातो. तसेच, इमारतीचे चालू कामही पाहू दिले जाते. मात्र, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना इमारतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. तसेच, सँपल प्लॅटही पाहू दिला जात नाही, असा तक्रारी लाभार्थी करीत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतील बोर्हाडेवाडीत 14 मजली एकूण 6 इमारती आहेत. तर, चर्होली गृहप्रकल्पात 14 मजली 7 इमारती आहेत. दोन्ही गृहप्रकल्पाचे काम 60 टक्के इतके झाले आहे.
बोर्हाडेवाडीतील दोन इमारतींचे काम पूर्ण होऊन त्यांना रंग देण्याचे काम सुरू आहे. इमारती पूर्ण झाल्यानतर तेथील सदनिकांचे वितरण केले जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेसाठी एप्रिल व मे 2017 मध्ये नागरिकांकडून अर्ज घेण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयात उन्हात रांगा लागून नागरिकांनी अर्ज भरले. एक लाख 47 हजार 127 नागरिकांनी अर्ज भरले.
त्या अर्जावर काहीच कार्यवाही न करता त्यांनतर 5 हजार रुपयांचा डीडीसह ऑगस्ट ते ऑक्टोबर 2020 मध्ये नव्याने अर्ज भरून घेण्यात आले. 49 हजार 163 अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी 3 हजार 664 कुटुंबांना सदनिका मिळणार आहेत. काहीची कर्ज प्रकरण होत नसल्याने पात्र लाभार्थ्यांना बाद करून प्रतिक्षा यादीतील नागरिकांना सदनिका दिल्या जाणार आहेत.
बोर्हाडेवाडी प्रकल्पातील सदनिकेचा स्वहिस्सा 6 लाख 21 हजार आहेत. चर्होलीतील सदनिकाचा स्वहिस्सा 6 लाख 69 हजार आणि रावेतमधील सदनिकेचा स्वहिस्सा 6 लाख 95 हजार आहे. ती सर्व रक्कम भरल्यानंतर लाभार्थ्यांना सदनिकेची चावी मिळणार आहे.
दरम्यान, खरेदीखत करताना एक एप्रिल 2022 पासून मेट्रोचा एक टक्का अधिकची स्टॅप ड्युटी भरावी लागणार आहे. त्यांचा भुर्दंड लाभार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.