पुणे : फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर; परतीच्या पावसाचा परिणाम

पुणे : फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर; परतीच्या पावसाचा परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आठवड्यापूर्वीपर्यंत राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाने केलेल्या तांडवामुळे भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यातच दिवाळी सणामुळे शेतकर्‍यांनी भाज्यांची तोड थांबवली. परिणामी, भाज्यांची आवक घटली आहे. राज्यातील पुणे, नाशिक जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांत झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई-ठाणे आणि पुण्यात भेंडी, गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरस-बी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25 टक्केच येत असल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ बाजारात गवार 120 ते 150 रुपये प्रतिकिलोने, तर वाटाणा 200 ते 250 रुपये प्रतिकिलोने विक्री केले जात आहे. तसेच, नेहमी स्वस्त असणार्‍या फ्लॉवरची विक्रीदेखील 100 रुपये प्रतिकिलोने करण्यात येत आहे.

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे प्रतिकिलोचे भाव : टोमॅटो – 80 ते 100, कांदा – 20 ते 40, बटाटा – 30 ते 40, गवार – 120 ते 150, वांगी – 120 ते -150, प्लॉवर – 80 ते 100, कोबी – 80 ते 100, वाटाणा 200 ते 250, पालेभाज्या (प्रत्येक गड्डीचे भाव) : कोथिंबीर 50 ते 60, मेथी – 50 ते 60, कांदापाला – 50 ते 60, शापू 40 ते 50, पालक 40 ते 50

शेतात अजूनही पाणी…
परतीच्या पावसामुळे अजूनही सिन्नर, येवला, नाशिक तालुक्यांतील अनेक शेतांमध्ये दलदलीसारखी स्थिती आहे. त्यामुळे भाजीपाला काढण्यास अडचणी येत आहेत. ही स्थिती अजून 10-12 दिवस राहण्याची
शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

परतीच्या पावसाचा फटका आणि दिवाळीचा सण यामुळे मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे घाऊक आणि किरकोळ बाजारात फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काही आठवडे याच प्रकारची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
                                                          – विलास भुजबळ, अडतदार,
                                                     श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, पुणे

पावसामुळे सगळ्या फळभाज्या व पालेभाज्या खराब झालेल्या आहेत. त्यातच दिवाळी सणामुळे शेतकर्‍यांनीही मालाची तोड केलेली नाही. पर्यायाने मालाची आवक घटली असून, भाव वाढलेले आहेत. परतीच्या पावसामुळे सर्व फळभाज्यांचे नुकसान झाले असून, दर आवाक्यात येण्यास एक महिन्याचा कालावधी लागू शकेल.

                                                – राजेंद्र कासुर्डे, किरकोळ भाजी विक्रेते

logo
Pudhari News
pudhari.news