Pimpri News : खासगी रक्तपेढ्यांमध्ये दर नियमावलीची ऐशी-तैशी

Pimpri News : खासगी रक्तपेढ्यांमध्ये दर नियमावलीची ऐशी-तैशी
Published on
Updated on

पिंपरी : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातील नागरिकांनी रक्तदान करून दिलेल्या रक्ताची काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये जादा दराने विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रक्तपेढ्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा रक्त आणि रक्त घटकासाठी काही प्रमाणात जादा रक्कम घेतली जात असल्याचे आढळत आहे. सेवा कर आणि बीपी सेटच्या नावाखाली ही जादा रक्कम आकारण्यात येत आहे. शासनाने रक्त आणि रक्त घटकांसाठी 8 फेबु्रवारी 2023 रोजी जारी केलेल्या सुधारित सेवा शुल्कानुसार शहरातील शासकीय आणि अशासकीय (खासगी) रक्तपेढ्यांमध्ये दर आकारले जातात का, याची तपासणी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने केली.

महापालिका रक्तपेढीत कमी दर

महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कार्यरत असलेल्या रक्तपेढीत होल ब्लडसाठी (पूर्ण रक्त) सरकारी दरापेक्षा कमी दर आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. येथील रक्तपेढीत पूर्ण रक्ताच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपये दर आकारला जात आहे. शासनाने त्यासाठी 1100 रुपये दर ठरविलेले आहेत.

रक्तपेढ्यांचे म्हणणे काय ?

शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जादा दर आकारणार्‍या काही खासगी रक्तपेढ्यांतून सांगण्यात आले की, सेवाशुल्क आणि बीपी सेटसाठी आम्ही अतिरिक्त रक्कम आकारतो. त्याचप्रमाणे, शासनाने दरामध्ये सुधारणा केली असल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.
राष्ट्रीय ऐच्छिक

रक्तदान दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 1 ऑक्टोबर 1975 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे. तरुणपिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, प्रोफेशनल डोनर व बदली रक्तदाता ही संकल्पना कालबाह्य करून स्वैच्छिक रक्तदानाची मुहूर्तमेढ रुजवणे, निरोगी व तंदुरुस्त असतानादेखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा यामागचा हेतू आहे.

तपासणीत काय आढळले?

काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये जादा दर

चिंचवड येथील खासगी रक्तपेढीत पूर्ण रक्तासाठी आणि पॅक्ड रेड सेलसाठी शासनाने ठवून दिलेल्या दरानुसारच 1500 रुपये इतके दर प्रत्येक रक्त पिशवीसाठी आकारले जात आहेत. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट या रक्तघटकांसाठी प्रति रक्त पिशवीला 400 रुपये इतके दर निश्चित केलेले आहेत. मात्र, येथे त्यासाठी प्रत्येक पिशवीला 600 रुपये इतका दर आकारला जात असल्याचे आढळले आहे.

भोसरी येथील खासगी रक्तपेढीत रक्तदराबाबत विचारणा केली असता तेथे पूर्ण रक्त (होल ब्लड) उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तथापि, येथे पॅक्ड रेड सेलसाठी 1650 रुपये म्हणजे शासकीय दरापेक्षा 150 रुपये जास्त तर, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्ससाठी प्रत्येक पिशवीसाठी 600 रुपये इतका दर आकारला जात असल्याचे आढळले आहे. त्यासाठी शासनाने ठरविलेला दर हे प्रत्येक पिशवीसाठी 400 रुपये इतका आहे. पिंपरी येथील एका खासगी रक्तपेढीत रक्त आणि रक्तघटकाच्या दराची माहिती घेतली असता तेथे शासनाने ठरविलेल्या दरानुसारच आकारणी होत असल्याचे निदर्शनास आले.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत शासनाने ठरविलेल्या दराच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी दरात रक्त उपलब्ध आहे.

– शंकर मोसलगी,
रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रुग्णालय रक्तपेढी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news