पुणे : कोरेगाव भीमा शौर्य दिनाची पूर्वतयारी सुरू

पुणे : कोरेगाव भीमा शौर्य दिनाची पूर्वतयारी सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दर वर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनानंतर पहिल्यांदाच पुढील वर्षी होणारा कार्यक्रम निर्बंधमुक्त असल्याने विजयस्तंभ शौर्य दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभाजवळ प्रशासनाकडून पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात येत आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच हा कार्यक्रम निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यानुसार विजयस्तंभ परिसरात पार्किंग व्यवस्था, वाहतूकव्यवस्था, अनुयायांसाठी मंडपाची व्यवस्था, विजयस्तंभाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शौर्य दिन समन्वय समिती यांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत.

यंदाच्या शौर्य दिनाचे आयोजन बार्टी संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, वामन मेश्राम, भारतीय दलित कोब—ाचे विवेक चव्हाण, अर्जुन डांगळे, नाना इंदिसे, मनोज संसारे या आंबेडकरी नेत्यांच्या सभा होणार आहेत.
याबरोबरच शासनाने जाहीर केलेल्या 100 कोटींचे विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाचे कामकाज सुरू असून, यासंदर्भात समाजकल्याण आयुक्त यांच्याकडून वेळोवेळी बैठका घेण्यात येत आहेत.  7 नोव्हेंबर रोजी शहरातील आंबेडकरी पक्षसंघटनेच्या प्रतिनिधींशी संयुक्त बैठक घेऊन स्मारकाविषयी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असल्याचेही डंबाळे यांनी या वेळी सांगितले.

20 लाख आंबेडकरी अनुयायी दाखल होण्याचा अंदाज

शौर्यदिनी भीम अनुयायांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन वर्षे दिन साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षे कोरोनाचे सावट शौर्य दिनावर होते. यंदा पाच वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिन साजरा होत असल्याने जवळपास 20 लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतील, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news