

Bhigwan Pregnant Woman Body Found
भिगवण: भिगवणजवळील मदनवाडी पुलाच्या खाली पाण्यात २५ ते ३० वयोगटातील महिलेचा कुजलेल्या आणि चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. दि.२२) दुपारनंतर उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना प्राथमिक दृष्टीने हा खुनाचा प्रकार वाटत असून या गर्भवती महिलेच्या खुनाचे गूढ उकलणे भिगवण पोलिसांसमोर मोठे आवाहन बनले आहे. त्यामुळे घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांचीही गर्दी जमा झाली होती.
बारामती भिगवण राज्यमार्गावरील मदनवाडी पुलाच्या खालील बाजूस चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळला. त्यानंतर ही महिला सहा सात महिन्यांची गरोदर असल्याचेही पुढे आले आहे. अंदाजे पाच सहा दिवसांपूर्वी हा मृतदेह असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ओळख पटल्यानंतर पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येतील. तोपर्यंत याचे गुढ कायम राहणार आहे.