

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आगामी खरीप हंगामपुर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सहा विभागनिहाय बैठकांना येत्या 27 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. शेतकर्यांसाठी महत्वाचा असलेल्या खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी विभागाने तयारी केल्याची माहिती कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली.
महसूल विभागनिहाय होणारी प्रत्येक बैठक ही बहुतांशी संबंधित विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर विभागाची बैठक 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता, अमरावती विभागाची 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद विभागाची 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता, कोकण विभागाची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 3 मे रोजी दुपारी 4 वाजता होत आहे. नाशिक विभागाची 4 मे रोजी सकाळी 11 वाजता आणि शेवटची पुणे विभागाची बैठक 8 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यादृष्टिने सर्व विभागीय कृषी सह संचालकांना सूचना देण्यात आल्या असून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्यांना निमंत्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.