पुणे : जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये पुण्याचा प्रतीक साहू देशात सातवा

पुणे : जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये पुण्याचा प्रतीक साहू देशात सातवा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत पुण्यातील प्रतीक साहू हा विद्यार्थी देशात सातवा आला आहे. पुण्यातील इतरही अनेक विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्हान्समध्ये घवघवीत यश मिळवून आयआयटीत प्रवेश  निश्चित केले आहेत. यंदा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा कट ऑफ मात्र मोठ्या प्रमाणावर घसरला असून, गेल्या 16 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका कमी कट ऑफ जाहीर झाल्याचे आयआयटी प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवापूर्वी आयआयटी अ‍ॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला शहरातील दीड हजारांहून अधिक मुले बसली होती. जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याने अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी यंदा कमी विद्यार्थी बसले होते. त्यामुळे
साहजिकच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकालही घटला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा घटणार आहे.

यंदा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि कॉमन मेरिट लिस्टमध्ये रँक मिळवण्यासाठी आवश्यक असलेला कट ऑफ मोठ्या प्रमाणावर उतरला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 360 पैकी केवळ 55 गुणांची आवश्यकता होती. टक्केवारीत विचार केला, तर हे प्रमाण केवळ 15.28 टक्के होते.

विषयांचे कट ऑफही उतरले असून, विद्यार्थ्याने 120 पैकी 5 गुण मिळवले, तरीही तो उत्तीर्ण होऊ शकत होता. विद्यार्थ्यांची गुण मिळवण्याची क्षमता कमी झाल्याने ही स्थिती ओढवली. कोरोनामुळे दोन वर्षे जे ऑनलाइन शिक्षण झाले त्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसला  असल्याची माहिती प्रवेश परीक्षा तज्ज्ञांनी दिली आहे.

निकाल दृष्टिक्षेपात
1. सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदा कट ऑफ 15.28 टक्क्यांवर आला. 2.कोरोनामुळे ऑनलाइन प्रशिक्षण द्यावे लागल्याने मुलांमध्ये गुण मिळवण्याची क्षमता कमी झाली. 3. पुण्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही घटले. 4. विषयांच्या कट ऑफमध्येही मोठी घट 5. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी 120 पैकी केवळ 5 गुणांची आवश्यकता.

पुण्यात 350 विद्यार्थ्यांना मिळाले यश
पुण्यातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दिलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. दर वर्षी पुण्यातून 500 ते 600 विद्यार्थी उत्तीर्ण होतात. यंदा मात्र ही संख्या 150 ने घटली असून, जेईईसाठीचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक यामागे विविध कारणे असल्याचे सांगत आहेत.

मला विश्वास नव्हता, की मी देशात सातवा येईन. तयारी चांगली केली असल्याने गुण चांगले मिळतील, याची अपेक्षा होती. पण, निकाल लागल्यानंतर प्रचंड आनंद झाला असून, 360 पैकी 292 गुण मिळवण्यात यश आले आहे. दिवसातून 5 ते 7 तास अभ्यास करायचो. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो.

                                                                        – प्रतीक साहू, देशात सातवा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news