

eknath khadse son in law pranjal khewalkar faces human trafficking charges
पुणे : ड्रग पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर आता मानवी तस्करी केल्याचा आरोप केला जात आहे.
कु. सानवी बहुउद्देशीय संस्थने राज्य महिला आयोगाला पत्र पाठवत हा आरोप करताना या अनुषंगानेही चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर महिला आयोगाने पुणे पोलिस आयुक्त मानवी तस्करी विरोधी पथक, सायबर विभाग यांच्या मार्फत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे पोलिसांकडून झालेल्या कार्यवाहीचा अहवालही आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने सानवी बहुउद्देशीय प्रकल्पाचा आलेला अर्जाचा दाखल देत एक्स पोस्ट करून तपासाबाबतचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगास सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला होता.
खराडी परिसरात ज्या पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील संशयीत आरोपी प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. तर बर्याच वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचे नमूद करत यामध्ये रॅकेट दिसून येत असल्याचा संशय संस्थेने व्यक्त केला आहे. यामध्ये संघटित गुन्हेगारीचे तसेच मानवी तस्करी असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कार्यवाही व्हावी अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. याच अर्जाच्या अनुषंगाने महिला आयोगाने मानवी तस्करीच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.